(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Cases | चांगली बातमी! राज्यात आज नवीन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तर तब्बल 48 हजार रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात आज नवीन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. तर तब्बल 48 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात बऱ्याच दिवसांनंतर बाधित रुग्णांचा आकडा 30 हजारांच्या आत आला आहे. आज तब्बल 48 हजार 211 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर आज नवीन 26 हजार 616 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान आज 516 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आतापर्यंत कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 54,05,068 इतका झाला असून 48,74,582 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 82 हजार 486 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यात 4 लाख 45 हजार 495 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.
Maharashtra reports 26,616 new #COVID19 cases, 48,211 recoveries and 516 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) May 17, 2021
Total cases 54,05,068
Total recoveries 48,74,582
Death toll 82,486
Active cases 4,45,495 pic.twitter.com/6YBuyCaP85
मुंबईत आजही कोरोना रुग्णसंख्येत घट
मुंबईत आज 1240 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2587 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज 48 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 34 हजार 288 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत आतापर्यंत 6,89,936 कोरोना रुग्णसंख्या झाली आहे. पैकी 6,39,340 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. तर 14 हजार 308 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट
पुणे शहरात आज नव्याने 684 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 59 हजार 987 इतकी झाली आहे. दिवसभरात 2 हजार 790 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील 2 हजार 790 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 33 हजार 798 झाली आहे.
दिवसभरात 7 हजार 862 टेस्ट
पुणे शहरात आज एकाच दिवसात 7 हजार 862 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 23 लाख 72 हजार 34 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 18 हजार 440 रुग्णांपैकी 1402 रुग्ण गंभीर तर 5,287 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
नव्याने 43 मृत्युंची नोंद
पुणे महापालिका हद्दीत नव्याने 43 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 7 हजार 749 इतकी झाली आहे. दरम्यान, पुणे महापालिकेस लसींचा पुरवठा न झाल्याने मंगळवार, 18 मे, 2021 रोजी पुणे मनपा हद्दीतील सर्व कोरोना लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.