Maharashtra Corona Update : धोका वाढला, राज्यात शनिवारी 1357 कोरोना रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण मुंबईत
Maharashtra Corona Update :राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्यादेखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 5888 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4294 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आज राज्यात 1357 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 595 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 889 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.
राज्यात आज एकूण 595 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,37,950 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.05 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णाांची एकूण सांख्या 78,89, 212 इतकी झाली आहे.
सक्रिय रुग्णसंख्या वाढली
राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्यादेखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 5888 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4294 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 769 इतके सक्रिय रुग्ण आढळतात. 28 मे रोजी बीए 4 आणि बीए 5 ओमायक्रॉन सब व्हेरीयंट रुग्णांची नोंद झाल्यानंतर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. 27 मे रोजी राज्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 2 हजार772 तर आज म्हणजेच 4 जून रोजी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 5 हजार 888 वर गेली आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 8,10,35,276 इतक्या प्रयोगशाळा तपासण्या झाल्या आहेत. त्यापैकी 9.74 टक्के नमुने हे पॉझिटिव्ह सापडले आहेत.
राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्क अनिवार्य
मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे राज्य सरकारही सतर्क झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोर्डवर आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.