Coronavirus : नांदेडमध्ये कोविड रुग्णालयं फुल्ल; ऑक्सिजन साठाही संपला, उपचारांसाठी रुग्णांची वणवण
संपूर्ण जिल्ह्यातून शासकीय रुग्णालयात अनेक रुग्ण नांदेड येथील डॉ. शंकराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात. परंतु कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे येथे बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना परत पाठवलं जात आहे.

नांदेड : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच वीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. अशातच शहरांसोबतच अनेक जिल्ह्यांमध्येही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयं कोरोना रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. तसेच रुग्णालयातील ऑक्सिजन काही तासांत संपणार असल्याची धक्कादायक माहिती डॉ. शंकराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एस. चव्हाण यांनी एबीपी माझाला फोन वरून दिली आहे. शासकीय मेडिकल कॉलेज येथे रुग्णांना अक्षरशः परत पाठवलं जात आहे.
संपूर्ण जिल्ह्यातून शासकीय रुग्णालयात अनेक रुग्ण नांदेड येथील डॉ. शंकराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात. परंतु कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे येथे बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना परत पाठवलं जात आहे. काल (शनिवारी) 6 एप्रिल रोजी जिल्ह्याचे पालक मंत्री अशोक चव्हाण यांनी 200 बेडच्या जम्बो कोविड सेंटरला मान्यता मिळाल्याचे सांगितले होते. पण आज ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं विदारक सत्य समोर येत आहे. तर बेड अभावी रुग्णांना वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतोय.
या रुग्णालयातील परिस्थिती विषयी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनीही यावर काहीही उत्तर देणं टाळलं आहे. तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचं काम अन्न आणि औषध प्रशासनाचे आहे, पण आज जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन अपुरा पडतो आणि त्यामुळे रुग्णांचे हाल होतात, या सर्व प्रकाराला जबाबदार आणणाऱ्यावर कारवाही होणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
आज नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नांदेड शहरातील कोरोना बाधित तरुणी बेडसाठी कुटुंबासह वणवण भटकत होती. समर्थ नगर येथील श्रावणी मामीडवारच्या घरातील सर्वच सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज श्रावणी स्वतः बाधित असून ती आपल्या आजोबांना रुग्णालयात घेऊन आली. पण या ठिकाणी बेड उपलब्ध नसल्यानं शहरातील दुसऱ्या रुग्णालयात बेड मिळतो का याचा शोध ती घेत आहे. श्रावणीने यावेळी देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सामान्य लोकांना बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध करून द्या आणि जगण्यासाठी मदत करा, अशी हाक दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Thane Coronavirus : पुरेसा ऑक्सिजन साठा नसल्याने ठाणे पालिका हॉस्पिटलमधील रुग्णांचे स्थलांतर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
