Maharashtra Corona Cases: राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट; अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन
राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झालेला पहायला मिळाला. आज तब्बल 31 हजार 855 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे.
मुंबई : राज्यात आज विक्रमी 31 हजार 855 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. हा आकडा सर्वांच्याच चिंता वाढवणारा आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करुनही हा संसर्ग कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, आज नवीन 15 हजार 098 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2262593 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 247299 सक्रीय रुग्ण असू राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.21% झाले आहे.
बीड, नांदेडच्या लॉकडाऊन पाठोपाठ परभणीमध्येही संचारबंदी
वाढत्या कोरोना संसर्गाला आळा बसावा म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कडक संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी संचारबंदी जाहीर केलीय. आज सायंकाळी 7 वाजेपासून ते 1 एप्रिलच्या पहाटे 6 वाजेपर्यंत अशी 7 दिवसांची संचारबंदी असणार आहे. या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांना मुभा असणार आहे.
बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. उद्या (25 मार्च) म्हणजे गुरुवारी रात्री बारा वाजल्यापासून 4 एप्रिलच्या बारा वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. विशेष म्हणजे या दरम्यान जिल्ह्यातील पूर्ण वाहतूक व्यवस्था बंद असेल. अत्यावश्यक सेवा जरी चालू असल्या तरी किराणा दुकाने मात्र सकाळी 7 ते 9 या दोन तासाच्या वेळेमध्ये सुरू असतील तेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन सुरु ठेवावीत असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यात आज मध्यरात्री पासून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना रुग्णसंख्येचा आकडा लक्षात घेऊन ही कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 36 हजारावर गेली आहे. गेल्या 15 दिवसातील कोरोना रुग्णसंख्या 9 हजारावर गेली आहे. कालचा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 30 होता. या दरम्यान शाळा, महाविद्यालये,कोचिंग क्लासेस, लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, मेळावे, आठवडी बाजार,सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल्स, बार, सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, चित्रपटगृह, मॉल्स, जलतरण तलाव ,राजकीय सभा, मटण चिकनची दुकाने, पार्लर, सलून,सार्वजनिक ठिकाणी फिरणे हे सर्वतः बंद राहणार आहे.