धक्कादायक! विहिरीतून पाणी आणले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या, छ. संभाजीनगरमधील घटना
Chhatrapati Sambhaji Nagar : विहिरीतून पाणी न आणल्यामुळे पतीने पत्नीला संपवले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) पैठण तालुक्यातील पाचोड जवळील केकत जळगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीतून घागर भरून का आणले नाही म्हणून या क्षुल्लक कारणावरुन पत्ती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, संतप्त झालेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात काठीने मारहाण करून हत्या (Murder) केली आहे. ऐन गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिता उर्फ राधाबाई शहादेव बढे (वय 40 वर्षे) असे या मयत महिले नाव असून, शहादेव जिंबक बढे (वय 55 वर्षे) असे आरोपी पतीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केकतजळगाव येथील शहादेव बढे हे गावा शेजारील शेतामध्ये वास्तव्यास आहे. त्यांना एक विवाहीत मुलगी आणि एक आठ ते दहा वर्षाचा मुलगा आहे. दरम्यान बुधवारी (22 मार्च रोजी) संपूर्ण कुटुंबाने गुढिपाडव्याचा सण साजरा केला. दरम्यान घरात असताना संध्याकाळी शहादेव बढे यांनी पत्नीला विहिरीतून घागर भरुन पाणी का आणले नाही याबाबत जाब विचारला आणि या किरकोळ कारणावरुन पती पत्नीत वाद झाला.
किरकोळ वाद एवढ्या टोकाला गेला की, पतीने घरातील काठी घेऊन राधाबाई यांना मारहाण करायला सुरवात केली. दरम्यान याच मारहाणीत त्यांनी काठीने पत्नीच्या डोक्यात मारून जखमी केले. या बेदाम मारहाणीत आणि काठीने प्रहार केल्याने काठीचा वर्मीघाव लागल्याने राधाबाई घरातच कोसळून पडल्या. तसेच त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होऊन त्यांच्या मृत्यू झाला आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव...
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ. विशाला पा. नेहुल, पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलिस कर्मचारी सुधाकर मोहिते, नांदवे आदी.नी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करून शवविच्छेन करण्यात आला. मयताची मुलगी प्रियंका विशाल जायभाये यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडील शहादेव बढे यांना अटक करुन त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ऐन गुढिपाडव्याच्या दिवशीच ही घटना घडल्याने पंक्रोशित हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :