राज्य मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार ऑगस्टमध्येच होण्याची शक्यता, महायुतीच्याआमदारांना मिळणार संधी : सूत्र
राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या मंत्रीपदाच्या अपेक्षेवर पाणी फिरले. त्यातच आता लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा दावा केला जात आहे
मुंबई : राज्य मंत्री मंडळाचा (Cabinet Expansion) आणखी एक विस्तार ऑगस्टमध्येच होण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. यंदाच्या मंत्री मंडळ विस्तारात महायुतीच्या आणखी आमदारांना संधी मिळणार असून कॅबिनेटमध्ये आणखी मंत्र्यांची भर पडणार आहे. यंदा होणाऱ्याा मंत्रीमंडळ विस्तारात राज्यमंत्र्यांचीही नेमणूक होणार आहे. शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांच्या नेत्यांना विस्तारात संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रीपदाची अपेक्षा लावून बसले आहेत. दरम्यान असे असतानाच अजित पवारांनी (Ajit Pawar) सत्ताधारी शिवसेना-भाजपशी हातमिळवणी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुसऱ्यांदा झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रीपद मिळाले आहेत. तर राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या मंत्रीपदाच्या अपेक्षेवर पाणी फिरले. त्यातच आता लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा दावा केला जात असून, ज्यात शिंदे गटाच्या आमदारांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना-भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर सेनेचा मुख्यमंत्री झाला पण नऊ मंत्र्यांनी म्हणावी तशी खाती देण्यात आली नव्हती. यावरून भाजपने फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच खूश करून बाकीच्यांची बोळवण केल्याचीही चर्चा होती. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून सेनेच्या उर्वरित इच्छुकांना रोज मंत्रिपदाची शपथ घेतातानाची स्वप्ने पडतात. भरत गोगावले, संजय शिरसाठ, संजय बांगर, बच्चू कडू असे कितीतरी आमदार हे आपण उद्याच मंत्री होणार असे रोज माध्यमांना ठासून सांगत होते. पण त्यांचा उद्या काही उजाडत नव्हता. कोणतीही मंत्रीपदं द्या... खरं एकदाचं मंत्री करा असा पवित्राच शिवसेनेच्या इच्छुक आमदारांनी घेतल्याचं चित्र होतं. हे सगळे आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच बसले होते.
खातेवाटपात झुकते माप
मंत्रिमंडळाचे खातेवापट जाहीर झाल्यानंतर सर्व चित्र समोर आलं. जे शिंदेंना पाच-सहा वेळा दिल्लीला जाऊन जमलं नव्हतं ते अजित पवारांनी एकाच दिल्लीवारीत करून दाखवलं. अजित पवार दिल्लीत गेले, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांनी थेट अर्थमंत्री, सहकारमंत्री, कृषीमंत्री अशी महत्त्वाची पदं पदरात पाडून घेतली. अजित पवार सत्तेत आल्यानंतर आधीच वैतागलेल्या शिंदे गटाला आता हा नवीनच धक्का आहे. म्हणजे महाविकास आघाडी सरकार सुरळीत सुरू असताना ते भाजपकडे आले... पण त्यांना मंत्रिपदासाठी झुलवत ठेवण्यात आलं. नंतर आलेल्या अजित पवार गटाला मात्र एका दमात नऊ मलईदार मंत्रिपदं देण्यात आली.