Tukaram Mundhe : आयुक्त तुकाराम मुंढेंची बीड जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट, आरोग्य यंत्रणेची उडाली झोप, पुढे काय घडलं?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी आयुक्त आरोग्य सेवा तसेच संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा पदभार घेतल्यानंतर कारवाईला सुरुवात केली आहे.
Tukaram Mundhe : डॅशिंग अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे, असे तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) हे पुन्हा अॅक्शन मोडवर आलेले पाहायला मिळत आहेत. मुंढे यांनी आयुक्त आरोग्य सेवा तसेच संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा पदभार घेतल्यानंतर कारवाईला सुरुवात केली आहे. ऐन दिवाळीमध्ये (Diwali 2022) तुकाराम मुंढे मराठवाडा (Marathwada) दौरा करत असल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. रुग्णालयात तुकाराम मुंढे यांची अचानक एंट्री झाल्यामुळे रुग्णालय प्रशासनाची मात्र चांगलीच धांदल उडाली होती. काय घडले नेमके?
ऐन दिवाळीत तुकाराम मुंढेंची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट
राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे हे बीड जिल्ह्यात असलेल्या आपल्या गावी दिवाळी निमित्त आले होते. मात्र कर्तव्यदक्षता दाखवत तुकाराम मुंढे यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयाला सायंकाळच्या वेळी अचानक भेट दिली आणि तिथल्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली. यावेळी त्यांनी कामात कुचराई करणाऱ्या आणि रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलंच झोपलं आहे. तसेच सायंकाळच्या वेळेस त्यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्याने वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जाऊन तुकाराम मुंडे यांनी रुग्णांची विचारपूसही केली.
...तर नोकरी सोडून द्या, आरोग्य कर्मचाऱ्यांची कानउघडणी
तुकाराम मुंढे हे अति दक्षता विभागात गेले असता त्या ठिकाणी औषधाचे रेकॉर्ड त्यांना आढळून आलं नाही, यावेळी त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना काम जमत नसेल तर नोकरी सोडून द्या अशा शब्दात कान उघडनी केली आहे. जिल्हा रुग्णालयात अचानक आलेल्या तुकाराम मुंढे यांच्यामुळे रुग्णालय प्रशासनाची मात्र चांगलीच धांदल उडाली होती, तर यावेळी अनेक डॉक्टरांना व्यवस्थित उत्तर देखील देता आली नाहीत, त्यामुळे देखील तुकाराम मुंडे चांगलेच संतापले होते.
कर्मचारी रुग्णालयातच तळ ठोकून
तुकाराम मुंढे आपल्या दौऱ्या दरम्यान मराठवाड्यातील विविध रुग्णालयांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यामुळे कारवाईच्या भीतीपोटी कर्मचारी रुग्णालयातच तळ ठोकून आहे. चार दिवसाच्या दौऱ्यादरम्यान तुकाराम मुंढे आता किती अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात
माहितीनुसार, तुकाराम मुंढे यांचा दौरा 25 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान राहणार आहे. दरम्यान तुकाराम मुंडे यांनी रुग्णालयाला अचानक भेट देऊन गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तर आरोग्य यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी ते व्हीसीद्वारे अधिकारी यांच्याशी संवाद साधत असल्याचे समजते. जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहे.