...तर पेट्रोल, डिझेल प्रतिलीटर 30 रुपयांनी कमी दरात मिळालं असतं : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील(chandrakant Patil)यांनी म्हटलं आहे की, अजित पवारांनी(Ajit pawar)इंधन जीएसटीमध्ये येऊ दिलं नाही.नाहीतर आता पेट्रोल डिझेल प्रतिलीटर 30 रुपयांनी कमी दरात मिळालं असतं, असं पाटील म्हणाले
कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) यांनी आज कोल्हापुरात बोलताना बंदवरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. सोबतच त्यांनी अजित पवार (AJit pawar)यांच्यावरही आपल्या शैलीत ताशेरे ओढले. पेट्रोल डिझेल दरवाढीबद्दल विचारलं असता पाटील म्हणाले की, अजित पवारांनी इंधन जीएसटीमध्ये येऊ दिलं नाही. नाहीतर आता पेट्रोल डिझेल प्रतिलीटर 30 रुपयांनी कमी दरात मिळालं असतं. अजित पवार यांनी इंधन जीएसटीमध्ये आणावं उद्या दर कमी होईल, असं ते म्हणाले.
पाटील म्हणाले. शेतकऱ्यांना पंचनामे न होता नुकसान भरपाई मिळावी. आता विदर्भ, मराठवाड्यात प्रचंड नुकसान झालं आहे. अजित पवार हे हुशार राजकारणी आहेत. ते काय करतात MPSCचा विषय निघाला की एक फसवी घोषणा करतात. 31 ऑगस्टच्या आधी एमपीएससीच्या जागा भरु, तसंच काल त्यांनी वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू अशी घोषणा केली. ही वेळ कधी येणार आहे. या विषयात संवेदनशीलता नाही. या विषयासाठी बंद करण्यात आला आहे. यूपीमध्ये लखीमपूरच्या घटनेसाठी बंद नाही. ही राजकीय पोळी भाजण्याचं काम आहे. लोकांना हे सगळं कळतंय, असंही ते म्हणाले. या बंदमुळं शेतकऱ्यांचं समाधान झालेलं नाही. हा रोष येणाऱ्या निवडणुकीतून दिसेल. हा बंद म्हणजे नाटक आहे, असंही ते म्हणाले.
Maharashtra Bandh Live Updates : काही ठिकाणी कडकडीत बंद तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद
शिवसेनेच्या मनात हा बंद करणं नव्हतं - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील म्हणाले की, हा बंद म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचं काम आहे. खुर्ची टिकवायची तर शरद पवार यांचे ऐकावं लागतं. म्हणून शिवसेना या बंद मध्ये उतरली आहे. शिवसेनेच्या मनात हा बंद करणं नव्हतं, असंही ते म्हणाले. उत्तरप्रदेशातील लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यात महाविकास आघाडीतील पक्षांकडून बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला राज्यभरात अनेक ठिकाणी प्रतिसाद मिळतोय तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद आहे. या बंद संदर्भात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोल्हापुरात बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारला शेतकऱ्यांबद्दल प्रेम नाही, महाराष्ट्रात जी कारवाई सुरू आहे त्यावरून लक्ष वेधण्यासाठी हा बंद केला जातोय. लखीमपूरमध्ये जी घटना घडली त्याला भाजपला का लेबल लावलं जातं आहे. मावळमध्ये तर पोलिसांनी शेतकऱ्यांना शोधून शोधून मारलं होतं. याठिकाणी एका व्यक्तीने ही घटना घडवली आहे. त्याची चौकशी करावी आणि कारवाई करावी. शेतकऱ्यांनी देखील गाडीतील चार जणांना ठेचून ठेचून मारलं, असं पाटील म्हणाले.