Dada Bhuse vs Ajit Pawar: दादा भुसे म्हणाले भाकरी मातोश्रीची, चाकरी शरद पवारांची, अजित पवार कडाडले
Dada Bhuse vs Ajit Pawar : संजय राऊत यांच्या आरोपांचं ट्वीट दादा भुसे यांनी सभागृहात वाचलं. दादा भुसे राऊतांना उद्देशून म्हणाले की, भाकरी खातात मातोश्रीची, चाकरी करतात शरद पवारांची. यावर अजित पवार भुसे यांच्यावर कडाडले.
Dada Bhuse vs Ajit Pawar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्याचे पडसाद विधानसभेत होते. दादा भुसे यांनी संजय राऊत यांचं ट्वीट सभागृहात वाचून दाखवलं. संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात, असं म्हणताच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भडकले. तुम्हाला जे बोलायचं ते बोला पण शरद पवार यांचा उल्लेख केला, तो करायला नको होता, असं म्हणत अजित पवार यांनी दादा भुसे यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
संजय राऊत यांचं ट्वीट
संजय राऊत सोमवारी (20 मार्च) रात्री त्यांनी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केले. दादा भुसे यांच्या गिरणा अॅग्रो कंपनीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "शेतकरी त्यांच्याविरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल…"
हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अग्रो नावाने178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 20, 2023
ही लूट आहे.लवकरच स्फोट होईल.@dir_ed@Dev_Fadnavis pic.twitter.com/fYuLIZEhEL
भाकरी मातोश्रीची, चाकरी शरद पवारांची, महागद्दार संजय राऊत : दादा भुसे
संजय राऊत यांच्या आरोपांवर दाद भुसे चांगलेच संतापले. त्यांनी संजय राऊत यांचं ट्वीट सभागृहात वाचून दाखवलं. त्यानंतर संजय राऊत यांच्यावर टीका करताना दादा भुसे म्हणाले की, "आम्हाला गद्दार म्हणाले. मात्र आमच्याच मतांवर निवडून गेलेले महागद्दार काल माझ्या संदर्भात बोलले. त्यांनी ट्वीट केलं, जर त्यात तथ्य असेल तर कारवाई करावी नाहीतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. हे मातोश्रीची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात. त्यांनी माफी मागावी नाही तर त्यांना जागा दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही."
शरद पवारांच्या उल्लेखानंतर अजित पवार आक्रमक
दादा भुसे यांनी शरद पवार यांचा उल्लेख करताच विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले. "दादा भुसे यांनी आपली भूमिका मांडताना शरद पवार यांचा इथे उल्लेख करणं योग्य नाही. मोदी साहेबही पवार साहेब यांच्या संदर्भात काय बोलतात हे आपल्याला माहीत आहे. दादा भुसे तुम्ही तात्काळ माफी मागा, असं अजित पवार म्हणाले. तर दादा भुसे यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ते सर्व प्रसारमाध्यमांमध्ये गेलेलं आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही म्हणाले.
मी शरद पवार यांच्याबद्दल वाईट बोललो नाही : दादा भुसे
यावर उत्तर देताना दादा भुसे म्हणाले की, मी शरद पवार यांच्यासंदर्भात काही वाईट बोललो नाही. मी शरद पवार यांची चाकरी करतात एवढेच बोललो. अध्यक्ष तुम्ही तपासुन पाहा. मी चुकीचं बोललो नाही.
विधानसभा अध्यक्ष काय म्हणाले?
यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, "दादा भुसे जे बोलले आहेत ते मी तपासून पाहिलं आणि रेकाॅर्डवरुन काढण्याची कारवाई केली जाईल."