Maharashtra Police : राज्यातील 17 पोलिसांना शौर्यपदक, 39 जणांना राष्ट्रपती पदक जाहीर, वाचा यादी
President's Medal : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील तीन पोलिसांना उल्लेखनी सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं आहे.
मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील 17 पोलिसांना शौर्यपदकाने गौरवण्यात आलं आहे. उल्लेखनीय सेवेसाठी तीन पोलिसांना, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 39 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांनाही शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.
याशिवाय मुंबईत कार्यरत सहाय्यक पोलिस आयुक्त विजय हातिस्कर, आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदानंद राणे आणि दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवे'बद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले.
अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव रामच्छबिला प्रसाद, संचालक राजेंद्र डहाळे आणि पोलिस सहआयुक्त सतीश गोवेकर यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. तसेच राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून 39 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनाही पदक जाहीर झाले आहे. संजीव धुमाळ हे 18 वर्षे मुंबईतील खंडणी विरोधी पथकात कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीत कुख्यात गँगस्टर संतोष शेट्टी, बंटी पांडे यांच्या अटकेसाठी धुमाळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्याशिवाय दत्तात्रय तुळशीदास शिंदे (उपमहानिरीक्षक), संदीप गजानन दिवाण (उपमहानिरीक्षक) आणि शिवाजी ज्ञानदेव फडतरे (उपमहाधीक्षक) यांनाही गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.