Nashik Crime : भयंकर! वाईट स्वप्न पडतात म्हणून युवकाने जीवन संपवलं! नाशिक शहरातील घटना
Nashik Crime : नाशिकमधील (Nashik) युवकाने स्वप्नांना कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Nashik Crime : राज्यात आत्महत्यांच्या (Suicide) घटना काही नवीन नाहीत. दिवसेंदिवस आत्महत्यांच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. अशातच नाशिकमधील (Nashik) एका युवकाने स्वप्नांना कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनंदिन आयुष्यात अनेकांना स्वप्न पडत असतात. अनेकदा चांगली स्वप्न (Dreams) किंवा वाईटही स्वप्न पडत असतात. वाईट स्वप्नांमुळे मनुष्य अनेकदा दचकून उठतो. तर चांगल्या स्वप्नांनी माणूस हुरळूनही जातो. मात्र एका युवकाला वारंवार वाईट स्वप्न पडत असल्याने वैतागून स्वतःला संपविले आहे. नाशिक शहरातील अंबड परिसरातील दत्तनगर भागात ही घटना घडली आहे. या युवकाने स्वतःवर पेट्रोल टाकून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मूळचा धुळे (Dhule) येथील असलेला विशाल विश्वास कडवे (Vishal Kadve) हा बावीस वर्षीय तरुण कामधंद्यासाठी नाशिकमध्ये आला होता. अंबड परिसरात तो भाड्याने खोली घेऊन एमआयडीसीत कामाला जात असायचा. मात्र त्याला वारंवार वाईट स्वप्ने पडत असायची स्वप्नात कुणी मुलगी त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळत असल्याचे स्वप्न त्याला दररोज रात्री पडत असायचे. या स्वप्नांना कंटाळून त्याने अंबड परिसरात राहत्या घरासमोर स्वतःवर पेटतील टाकून आत्महत्या केल्याचे वडील विश्वास कडवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समोर आले.
दरम्यान संबंधित तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. परिसरातील नागरिकांनी भीतीपोटी मदत करण्याचे टाळले. यात तरुणाचा करुण अंत झाला. घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर घटनेची माहिती संबंधित युवकाच्या नातेवाईकांना कळविली. त्यानंतर वडील विश्वास कडवे यांनी नाशिक गाठून पुढील कार्यवाहीसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अंबड पोलिसांकडे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
जाळून टाकणार स्वप्न
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित युवक अंबड परिसरात वास्तव्यास होता. तो अंबड एमआयडीसी परिसरात कामाला जात असे. कंपनीतून घरी आल्यानंतर त्याला रात्री स्वप्नांत कुणी मुलगी त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळत असल्याचे दिसत असायचे. हे रोज रात्री होत असल्याने संबंधित तरुण वैतागला होता. अखेर त्याने या वाईट स्वप्नांना कंटाळून स्वतःवर पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याची घटना समोर आली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
