(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhaji Nagar : एकतर्फी प्रेमातून भाच्याचा मामाच्या मुलीशी लग्नाचा हट्ट; नकार देताच विकृतीवर उतरला
Chhatrapati Sambhaji Nagar : शेवटी मामाने पोलिसात धाव घेतली आणि 23 वर्षीय भाच्याविरोधातच सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : एकतर्फी प्रेमातून भाच्याने मामाच्या मुलीशी लग्नाचा हट्ट धरला. मात्र, मुलीला शिकवायचे असल्याने मामाने लग्नासाठी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे याचा राग आल्याने भाच्याने मामाच्या मुलीचे फोटो एडिट करुन, व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) समोर आला आहे. त्यामुळे शेवटी मामाने पोलिसात धाव घेतली आणि 23 वर्षीय भाच्याविरोधातच सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील रवी (नाव बदलेले) काही दिवस गावातच राहत होता. तर त्याच्या मामाचे कुटुंबदेखील त्याच गावातच राहत होते. दरम्यान रवीने काही दिवसांपूर्वीच मामाकडे मुलीचा हात मागितला होता. मात्र, मुलीला पुढे आणखी शिक्षण घ्यायचे असल्याने लग्नास स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत वाईटपणा येण्यास सुरुवात झाली आणि वाद होऊ लागले. विशेष म्हणजे मामाने रवीला वारंवार समजावून सांगितले. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एवढंच नाही तर त्याने मामाच्या मुलीचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्याचा देखील प्रयत्न केला.
व्हिडीओ तयार करुन व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले.
मामाने मुलीचा हात देण्यास नकार दिल्याने रवीने मे महिन्यात पहिल्यांदा मामाच्या मुलीची छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड केला. दरम्यान याची माहिती मिळाल्याने मामाच्या कुटुंबाने रवीला समजावून सांगून ते छायाचित्रे तात्काळ डिलीट करण्यास सांगितले. परंतु, रवीने हा विकृत प्रकार सुरुच ठेवला. पुढे त्याने मुलीचे छायाचित्र एडिट करुन, व्हिडीओ तयार करुन व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले. तसेच सोशल मीडियावर देखील अपलोड केले. 19 मे ते 2 जूनदरम्यान हा प्रकार सतत सुरु होता. अनेकदा समजावून सांगितल्यावर देखील हा सर्व प्रकार थांबत नसल्याचे लक्षात आल्यावर मामाने अखेर पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. तसेच ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्यावरुन तात्काळ रवीवर गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावर महिलांची बदनामी करण्याचे प्रकार वाढले
एकतर्फी प्रेमातून सोशल मीडियावर महिलांची बदनामी करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत समोर येत आहे. विशेष म्हणजे एकतर्फी प्रेमातून महिले विषयी आक्षेपार्ह पोस्ट करण्याची छत्रपती संभाजीनगरमधील ही आठवड्यातली दुसरी घटना आहे. यापूर्वी 31 मे रोजी एका विवाहितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. विवाहितेच्या सोशल मीडिया अकांऊटवर अश्लील कमेंट करुन ती व्हायरल करण्यात आली होती. आरोपीने मुलीच्या नावाने अकाऊंट उघडून हे प्रकार सुरु केले असल्याचे देखील यावेळी समोर आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या: