महाजाॅब्स योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची की शिवसेना-राष्ट्रवादीची? : सत्यजीत तांबे
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील कुरबुरी सातत्याने समोर आहेत. त्यातच आता युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी महाजॉब्स योजनेवरुन सवाल उपस्थित केले आहेत.
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील कोणताही तणाव नाही, बिघाड नाही, असा दावा तिन्ही पक्षातील नेते करत असले तरी कुरबुरी सातत्याने समोर येत आहेत. आता युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरुन प्रश्न उपस्थित केला आहे. महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची? असा सवाल सत्यजीत तांबे यांनी विचारला आहे. याबाबत त्यांनी फोटो शेअर करुन ट्वीट केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'महाजॉब्स' पोर्टलचं 6 जुलै रोजी लोकार्पण झालं. राज्यातल्या उद्योगात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात हा हे पोर्टल सुरु करण्यामागचा उद्देश आहे. कंपन्यांना कुठले कामगार हवे आहेत याची माहिती या पोर्टलवर असणार आहे.
महाजॉब्सच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक आणि उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांची छायाचित्रे आहेत. परंतु काँग्रेसच्या एकाही नेत्याचा फोटो नाही. हाच धागा पकडत सत्यजीत तांबे यांनी प्रश्न विचारला आहे.
ट्वीटमध्ये सत्यजीत तांबे यांनी लिहिलं आहे की, " #महा_जॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे."
#महा_जाॅब्स् ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची ? आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. pic.twitter.com/k8CMmOsmJv
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 16, 2020
येत्या काळात जाहिरातीत दुरुस्ती होईल - राजीव सातव
दरम्यान काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनीही महाजॉब्सच्या जाहिरातीवर भाष्य केलं आहे. त्यांनीही याबाबत ट्वीट केलं आहे. "योजना चांगली आहे आणि आमचं पूर्ण सहकार्य आहे. पण लोकांसमोर जाता सरकार आघाडीचं आहे याची काळजी घेऊन जाहिरातीत दुरुस्ती होईल, अशी आशा," असं राजीव सातव यांनी म्हटलं आहे.
योजना चांगली आहे आणि आमचे पूर्ण सहकार्य आहेच. फक्त सरकार आघाडीचे आहे याची काळजी लोकांसमोर जाताना सर्वांनीच घ्यायला हवी. येत्या काळात या जाहिरातीत दुरुस्ती होईल अशी आशा. पुन्हा अशी चूक होणार नाही या खात्रीसोबत. pic.twitter.com/kQYnyhlMO1
— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) July 16, 2020
महाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध व्हावेत : मुख्यमंत्री
महाजॉब्स काय आहे? महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि खेड्यापाड्यातील ग्रामीण आणि शहरी युवकांना त्यांच्या कौशल्याला साजेसा सर्वोत्तम जॉब मिळवण्याची आणि यशस्वी करिअर घडवण्याची संधी महाराष्ट्र सरकार उपलब्ध करुन देत आहे. त्यामुळे या युवकांना प्रगतीपासून आणि औद्योगिक क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग घेण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही. जर त्यांनी त्यांच्या कौशल्याला मेहनतीची जोड दिली तर त्यांच्या प्रगती पुढे आकाश ठेंगणे होणार आहे. महाराष्ट्राला प्रगतीच्या पुढच्या पातळीवर घेऊन जाणे हेच आमचे स्वप्न आहे औद्योगिक विकासासाठी घेत असलेल्या मेहनतीशिवाय पुढील सर्व आव्हानांना तोंड देत पुढे जाण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे.
आता महाजॉबच्या रुपाने औद्योगिक रोजगार ब्युरो म्हणून कंपन्या आणि कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कामगारांमधील महादुवा महाराष्ट्र शासनाने निर्माण केला आहे. जिथे महाराष्ट्रातील सर्व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांना सतरा क्षेत्रात 950 अधिक व्यवसायामध्ये रोजगाराची एक अतिशय मोठी संधी आहे.
महाजॉब्स कसे वापरावे? जॉब शोधण्यासाठी उद्योगासाठी लॉगिनचे दोन पर्याय इथे देण्यात आलेले आहेत. लॉगिन केल्यानंतर कंपन्यांनी आपली नोंदणी करून कंपनीच्या सध्याच्या मनुष्यबळाविषयी आवश्यकता येथे नोंदवावी. कुशल-अकुशल अर्धकुशल अशा जॉबच्या शोधात असलेल्या व्यक्तीने नाव नोंदणीसाठी आपली तपशीलवार वैयक्तिक माहिती भरावी. अशाप्रकारे प्रत्येक खाजगी कंपनीला अपेक्षित मनुष्यबळ व प्रत्येक कामगाराला अपेक्षित जॉबचे असंख्य पर्याय महाजोबच्या मदतीने आपल्याच जिल्ह्यात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.