(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Radhakrishna Vikhe Patil : जनावरांच्या लसीकरणाबाबत युद्ध पातळीवर उपाययोजना राबवा, पशुसंवर्धन मंत्री विखे पाटलांच्या सूचना
राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. या परिस्थितीचा आढावा राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला.
Radhakrishna Vikhe Patil : राज्यातील पशुपलकांमध्ये सध्या चितेंचं वातावरण आहे. कारण जनावरांमध्ये लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढ आहेत. राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात लम्पी चर्मरोग या साथीच्या रोगाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil ) यांनी घेतला. विखे पाटील यांनी अकोला आणि जळगाव जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पशुपालकांशी संवाद साधला. तसेच लसीकरणाबाबत युद्ध पातळीवर योग्य त्या उपाययोजना राबवावण्याच्या सूचना देखील विखे पाटील यांनी केल्या आहेत.
मृत जनावरांच्या पशुपालकास प्रत्येकी 10 हजारांची मदत शासन करणार
राज्यात लम्पी स्कीन या साथीच्या आजाराने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अकोला जिल्ह्यातील निपाणा पैलपाडा तालुक्यामधील बाधित जनावरांची विखे पाटील यांनी पाहणी केली. तसेच तेथील पशुपालकांशी देकील संवाद साधला. यासोबतच बैठक आयोजित करुन अकोला, बुलढाणा आणि वाशीम या तीनही जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या रोगामुळे जनावरांचा मृत्यू होऊ नये म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मृत जनावरांच्या पशुपालकास प्रत्येकी 10 हजारांची मदत शासन करणार असल्याचे बैठकीत सांगितले आहे. बाधीत जनावरांचा उपचार आणि अबाधित जनावरांचे लसीकरण शासनातर्फे मोफत करण्यात येत असल्याची माहिती देखील विखे पाटील यांनी बैठकीत दिली.
उपाययोजना राबवण्यासाठी खासगी पशुवैद्यकांची मदत घ्यावी
दरम्यान, यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. तसेच लसीकरणाबाबत युद्ध पातळीवर योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना दिल्या. तसेच उपाययोजना राबवण्यासाठी खासगी पशुवैद्यकांची मदत घ्यावी, तसेच योग्य समन्वय ठेऊन नियोजन करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना कराव्यात अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली. जळगावमध्ये झालेल्या बैठकीस खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार एकनाथ खडसे, आमदार सुरेश भोळे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया उपस्थित होते.
राज्यातील 17 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव
राज्यात लम्पी स्कीन या आजाराचा शिरकाव हा गुजरात आणि राजस्थान या राज्यातून झाला आहे. या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असले तरी लसीकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. सद्यस्थितीत राज्यातील 17 जिल्हे प्रादुर्भावग्रस्त आहेत. संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. आंतरराज्यीय, आंतर जिल्हा, आंतर तालुकास्तरावर जनावरांची ने आण बंद करण्यात आल्याची माहिती देखील विखे पाटील यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: