Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क, बीडसह नगरमध्ये जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश
राज्यातील अनेक जिल्ह्यात जनावरांवर लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून बीड आणि अहदनगरच्या जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
![Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क, बीडसह नगरमध्ये जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश Administration alert in wake of lumpy skin, administration orders closure of animal markets in Ahmednagar and Beed District Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क, बीडसह नगरमध्ये जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/03/f92dce211049f59adb6269bd24bf19a11662185585259339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lumpy Skin Disease : राज्यातील पशुपालकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. कारण जनावरांवर लम्पी स्कीन (Lumpy Skin) या आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात जनावरांवर लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून बीड आणि अहदनगरच्या जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
बीड जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं तेथील पशुपालक चिंतेत आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव वाडू नये म्हणून जिल्हा प्रशासनं सतर्क झालं आहे. जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी, आष्टी, शिरुर कासार आणि पाटोदा या तालुक्यातील जनावरांचे बाजार पुढचे काही काळ बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. बीड जिल्ह्यातल्या धसवाडी येथे काही जनावरांमध्ये लंपी स्कीन आजार आढळून आल्याने जिल्हाभरातील इतर जनावरांना त्याची लागण होऊ नये म्हणून अंबाजोगाई, परळी, आष्टी आणि शिरुर तालुक्यासह पाटोदा येथील जनावरांचे बाजार भरवण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. यापूर्वी देखील या आजाराचा संसर्ग अनेक जनावरांना झाला होता. त्यामुळं हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याधिकाऱ्यांनी देखील जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातल्या धसवाडीमध्ये काही जनावरांना या लम्पी आजाराची लागण झाली असून, गायी आणि बैलांमध्ये या आजाराचा संक्रमण जास्त प्रमाणात होत आहे. या आजारामुळं जनावरांना तीव्र ताप येतो तर तहान भूक आणि रवंत करण्याची क्षमता देखील कमी होते. जनावरांमध्ये अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असा आवाहन पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव
राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश पाठोपाठ सध्या महाराष्ट्रातही लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील पशुपालक सध्या चिंतेत आहेत. राज्य पशुसंवर्धन विभागाकडून लम्पी आजार नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात हा त्वचा रोगाचा पादूर्भाव झाला आहे. संपूर्ण राज्यात 850 जनावरांना लम्पीने ग्रासले आहे. त्यापैकी आतापर्यंत 590 जनावरे बरी झाली असून उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहेत. तर संपूर्ण राज्यात आतापर्यंत 10 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात सध्या 67 जनावरांना हा आजार झाला असून पशुसंवर्धन विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Lumpy Virus : महाराष्ट्रातही लम्पी स्किन आजाराचे थैमान, आजाराची लक्षणे काय? काळजी काय घ्यावी?
- Lumpy Skin Disease : पशुपालकांनो सावधान! लम्पी स्कीन वाढतोय, देशातील 'या' राज्यात प्रादुर्भाव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)