Lumpy Skin Disease : लम्पी रोगामुळं झालेल्या नुकसानीपोटी राज्यातील तीन हजार 91 पशुपालकांच्या खात्यावर आठ कोटी जमा
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढला आहे. लम्पी रोगामुळं झालेल्या नुकसानीपोटी राज्यातील तीन हजार 91 पशुपालकांच्या खात्यावर आठ कोटी जमा करण्यात आले आहेत.
Lumpy Skin Disease : देशातील विविध राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. महाराष्ट्रातही 33 जिल्ह्यांमध्ये जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. दरम्यान, राज्यात लम्पी चर्मरोगामुळं मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3 हजार 91 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईपोटी 8.05 कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह (Sachindra Pratap Singh) यांनी दिली आहे.
1 लाख 12 हजार 683 पशुधन उपचाराने बरे
दरम्यान, राज्यामध्ये 31 ऑक्टोबर 2022 अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3 हजार 204 गावांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 1 लाख 72 हजार 528 बाधित पशुधनापैकी एकूण 1 लाख 12 हजार 683 पशुधन उपचाराने बरे झाले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर सध्या उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 140.97 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 136.48 लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे.
या जिल्ह्यामध्ये लसीकरण पूर्ण
दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यात जनावरांना लसीकरण पूर्ण झालं आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या जिल्ह्यांमध्ये जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करुन घेतलेल्या लसीकरणानुसार महाराष्ट्रात सुमारे 97.54 टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.
लम्पी चर्मरोगाच्या विषाणुच्या जनुकीय परिक्षणांतर्गत जिनोम क्रमवारी तपासणीसाठी आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे (National Institute of Virology (NIV) येथे पाठविण्यात आले आहेत. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहेत. तसेच लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमूने सात विभागांमधून प्रतिविभाग दोन गावातील पशुधनातील लसीकरणापुर्वीचे नमुने व लसीकरणानंतरचे रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. ते बंगळुरु येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोगमाहिती संस्थेत पाठवण्यात आले आहेत. त्यांचे निष्कर्ष देखील नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षीत असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.
लम्पी चर्मरोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या वासरे गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरुपात पुर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करुन घेण्याचं आवाहन सिंह यांनी यावेळी केले.
महत्त्वाच्या बातम्या: