Majha Katta : युद्धाचे परिणाम भारतावर होणार का?, युक्रेन-रशिया युद्धाचे सखोल विश्लेषण, पाहा काय म्हणतात गिरीश कुबेर
Majha Katta : सध्या जगभरात रशिया आणि युक्रेन या युद्धाची चर्चा सुरु आहे. या युद्धामुळे जग चिंतेत आहे. अणुयुद्धाची भीती व्यक्त होतेय. संपूर्ण युरोपजीव मुठीत घेऊन जगतोय
Majha Katta : सध्या जगभरात रशिया आणि युक्रेन या युद्धाची चर्चा सुरु आहे. या युद्धामुळे जग चिंतेत आहे. अणुयुद्धाची भीती व्यक्त होतेय. संपूर्ण युरोपजीव मुठीत घेऊन जगतोय. अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेले युद्ध जगातील प्रत्येकावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या परिणाम करतेय. म्हणूनच जिओपॉलिटकल परिस्थितीचे अचूक विश्लेषण करणारे आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक गिरीश कुबेर यांच्याशी माझा कट्ट्यावर चर्चा आणि संवाद साधला. यावेळी गिरीश कुबेर यांनी रशिया-युक्रेन युद्धावर आपलं परखड मत व्यक्त केले.
पुतीन यांच्यावर पुस्तक का लिहिले?
तेल, रशिया आणि पुतीन यांच्याविषयी सखोल माहिती घेत गेलो. तेव्हा असं जाणवले की, पुतीन ही एक व्यक्ती नाही, ती एक प्रवृती आहे. पुतीन यांनी तयार केलेले स्वत:चं प्रारुप लोकप्रीय झाले आहे. म्हणजे निवडणुकीच्या मार्गाने सत्तेवर यायचे आणि नंतर लोकशाही मार्गाची सर्व बिळे बंद करायची. पुतीन यांची ही प्रवृत्तीनंतर अनेकांनी स्वीकारली. टर्की आणि हंगेरीमधील राजकीय नेत्यांनी पुतीन यांची प्रवृत्ती स्वीकारली अन् सत्तेत आले. अनेक नेते पुतीन यांच्याप्रमाणे वागू लागले आहेत. या सर्व गोष्टींमधूनच पुतीन या पुस्तकाचा जन्म झाला, असे गिरीश कुबेर यांनी सांगितले. संमिश्र अशी ही रशियन अर्थव्यवस्था. काही धोरणात्मक क्षेत्रांत सरकारी मालकी योग्य मानणारी. खनिज तेल, नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेनं सजलेली आणि समर्थ झालेली ही अर्थव्यवस्था आजही सक्षम आहे. कारण जगातल्या एकंदर नैसर्गिक साधनसंपत्तीपैकी सुमारे 30 टक्के साठे एकटय़ा रशियाच्या भूमीत आहेत.
या युद्धाला पुतीन जबाबदार आहेत का?
2010 नंतर रशियाच्या आजूबाजूचे देश अमेरिका केंद्रीत नाटोचे सदस्य होत गेले. पोलंड आणि हंगेरीसारख्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ उभारण्यात आले. त्यामुळे रशियाला हे सुरक्षेचे कारण देता आले. त्यामुळे तत्वतः हे कारण योग्य आहे. अमेरिका दारापर्यंत आली असताना आम्ही कसे शांत जगू असे म्हणत रशियाने युद्ध पुकारले आहे. पण नाटोमधील कोणताही देश युद्ध करण्याच्या मनस्थिती आणि परिस्थितीमध्ये नाही. तसेच आणखी एक कारण म्हणजे पुतीन 2000 पासून सत्तेत आहेत. लोकांना खरे समजणार नाही, हे करण्यात पुतीन यांना यश आले होते. आणि आता हीच गोष्ट विरत चालली आहे. जगाचा इतिहास आहे, ज्या नेत्याला देशांतर्गत पातळीवर यश मिळत नाही, तो शेवटचा मार्ग राष्ट्रप्रेमाचा निवडतोच. आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी पुतीन यांनी युद्धाचा मार्ग अवलंबला असेल, असे कुबेर म्हणाले.
कॅथरीन द ग्रेटने तिच्याच काळात रशियाचा जवळपास पाच लाख २० हजार चौरस किमी इतका महाप्रचंड विस्तार केल्याची नोंद आहे. त्या वेळी किती मोठा असावा हा देश? तर पृथ्वीवरच्या एकूण भूमीतली एक षष्ठांश जमीन या देशाची होती. म्हणजेच तेव्हा दिवसाला सरासरी तब्बल ५० चौरस किलोमीटर देशाची वाढ होत होती. रशियाचे पूर्वीचे भाग आपलेच आहेत... असे म्हणून पुतीन यांनी क्रिमीया आणि आता युक्रेनवर हल्ला केला आहे. रशियाच्या अर्थकरणासाठी युक्रेनवर कब्जा करणे गरजेचं होते.
पुतीन यांच्या व्यक्तीमत्वामधील वैशिष्ट्ये कोणती?
पुतीन यांच्या यशामागे गुप्तहेर यंत्रणेतील प्रमुखपद हे एक महत्वाचे कारण आहे. पुतीन गुप्तहेर यंत्रणेतून आले अन् प्रमुख झाले आहेत. त्यांच्या यशामागील हे एक गुपीत आहे. अनेकांना पुतीन व्हावे वाटते.. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मला पुतीन व्हायला आवडेल, असे म्हटले होते.
युरोपमध्ये होतेय, त्याचा धोका आपल्याला किती आहे?
भारताच्या तटस्थ भूमिकेवर प्रश्नचिन्ह आहे. भूमिका घ्यायला हवी. रशियाच्या गटातील देशांनी भूमिका घेतली आहे. पुतीन यांचा सर्वात मोठा लाभदायक असणारा जर्मनी भूमिका बदलतेय... पण आपण का तटस्थ राहतोय.. हे न समजण्यासारखे आहे. उगीच कशाला भानगडीत पडा... ही भारताची भूमिका न पचणी पडण्यासारखी आहे. हे सर्व लोकशाहीच्या विरोधातील आहे. भारताने आपल्या भूमिकेवर पुन्हा एकदा विचार करायला हवा. या प्रकरणात काश्मीरची तुलना येथे होऊ शकत नाही. कारण, युक्रेन स्वातंत्र देश आहे. आणि काश्मीर हा भारताचा भाग आहे.
युद्धाचे परिणाम भारतावर होणार का??
आपल्याला फक्त तेलाची दरवाढ दिसतेय... पण तेलाशिवाय इतर दहा मोठ्या गोष्टी आहेत.. याची दरवाढ होऊ शकते. सात तारखेनंतर याचे परिणाम दिसून येथील. गव्हासोबत इतरही अनेक गोष्टी महागण्याच्या शक्यता आहे.
पुतीन यांच्या शेवटाची सुरुवात -
पुतीन यांनी जे काही केलेय... त्यामुळे त्यांच्या शेवटाची सुरुवात झाल्याचे दिसतेय. ते आज, उद्या किंवा आणखी कधीतरी.. पण पुतीन यांच्या शेवटाची सुरुवात झाली आहे. रशियामध्ये जनमत घेण्यात आले होते, त्यामध्ये प्रत्येकाला युक्रेन आपल्या बाजूने असावे असे वाटले.. पण युद्ध करुन नव्हे.. पण पुतीन यांनी युद्धाची भूमिका अवलंबली आहे.