महायुतीचा तिढा सुटला? जेपी नड्डा आणि एकनाथ शिंदेंमध्ये तासभर खलबतं, लोकसभा जागावटपावर चर्चा
Lok Sabha Election 2024 : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP nadda) बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महायुतीच्या जागावटपाबाबत चर्चा झाल्याचं समजतेय.
Lok Sabha Election 2024 : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP nadda) बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महायुतीच्या जागावटपाबाबत चर्चा झाल्याचं समजतेय. चार दिवसांपूर्वी जागावटपावरुन महायुतीमध्ये तिढा असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यातच आता जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील काही दिवसांत महायुतीचं जागावटापाबाबतची अधिकृत माहिती समोर येईल. जेपी नड्डा यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची बैठख पार पडली. या बैठकीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे राजकीय लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जेपी नड्डा-एकनाथ शिंदे यांच्यात तासभर खलबतं -
वर्षा निवासस्थानी जेपी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. तासभर झालेल्या या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरही यावेळी उपस्थित होते. महायुती म्हणून कशा प्रकारे आगामी निवडणुकांत लढले पाहिजे तसेच जनतेच्या आणि विकासकामांबाबत चर्चा झाली झाली. त्याआधी महायुतीच्या नेत्यांमध्ये स्नेहभोजन झालं. पण या बैठकीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एकही नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपासंदर्भातील तिढा सुटणार का? याची राजकीय चर्चा सुरु आहे.
महायुतीचा फॉर्मुला काय? -
सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये लोकसभेला 32-12-4 या सूत्रानुसार जागावाटप होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपच्या वाटयाला सर्वाधिक ३२ जागा येतील. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला १२ जागा येतील. तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागू शकते
भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या मतदारसंघावर दावा
शिवसेनेचे सध्याचे विद्यमान खासदार आणि गेल्या निवडणुकीत लढवलेल्या मतदारसंघावर भाजपच्या नेत्यांनी दावा ठोकला आहे. शिवसेनेच्या 18 खासांदारांपैकी 13 खासदार शिंदेंसोबत आहेत. पण यातील काही मतदारसंघामध्ये भाजपनं तयारी सुरु केली आहे. महायुतीची जागावाटपाची चर्चा सध्या प्राथमिक स्वरुपात सुरु झाली आहे. यामध्ये भाजपनं 32 जागांवर दावा ठोकलाय. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 12 जागांवर समाधान मानावे लागू शकतं. त्यामुळे महायुतीमध्ये भविष्यात तिढा वाढू शकतो. एकनाथ शिंदें यांना विद्यमान खासदारांसोबत काही दिग्गजांसाठीही तिकिट हवं आहे. त्यामुळे शिंदेवरील दबाव वाढू शकतो. दरम्यान, महायुतीमध्ये मित्रपक्षांकडील मतदारसंघांमध्येही भाजपनं तयारी केली आहे. येथील भाजपच्या काही नेत्यांनी त्यावर दावा ठोकलाय.