याला म्हणतात प्रेम! बिबट्याचा वृद्ध महिलेवर हल्ला; जीवाची बाजी लावून 72 वर्षीय पतीने वाचवला पत्नीचा जीव
Leopard attack : मोखाडा तालुक्यात घडलेल्या या घटनेने खरं प्रेम काय असतं हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं आहे.
पालघर : प्रेमात हिरो-हिरोईनसाठी जीवाची बाजी लावतो अशाप्रकारच्या घटना आपण चित्रपटात अनेकदा पाहिल्या आहेत. पण पालघरच्या मोखाडा तालुक्यात अशीच काहीशी घटना घडली. पण या घटनेतील 'हिरो' 72 वर्षीय आजोबा आहेत. त्यांनी आपल्या पत्नीसाठी जीवाची बाजी लावत तिला एका बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवलं आहे.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात शुक्रवारी (18 मार्च) रात्री दहा वाजताच्या सुमारात बिबट्याने एका वृद्ध महिलेवर हल्ला केला. पण वृद्ध महिलेच्या पतीने दाखवलेली समयसूचकता आणि धाडसामुळे या महिलेचे प्राण थोडक्यात बचावले आहे. मात्र हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. पोशेरा ग्रामपंचायत हद्दीतील पारध्याची मेट येथील शेतावर राहणाऱ्या काशिनाथ सापटे (वय 72 वर्ष) आणि त्यांची पत्नी पार्वती सापटे (वय 65 वर्ष) हे रात्री झोपले असताना बाहेर कसला तरी आवाज आला. या आवाजाचे कारण बघायला पार्वती सापटे उठल्या आणि घराबाहेर पडताच अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकताच त्यांचे पती काशिनाथ सापटे यांनी बिबट्याचा प्रतिकार करून आपल्या पत्नीला त्याच्या तावडीतून सोडविले. मात्र बिबट्या पळून न जाता तिथेच बसून राहिला. हे पाहून या दोघांनी आरडाओरड केला, त्यांचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी धाव घेऊन त्याला पिटाळून लावले.
ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण
हल्ल्यानंतर तोच बिबट्या काही तासाने परत एकदा गावाकडे येताना ग्रामस्थांना दिसला. यानंतर ग्रामस्थांनी फोनद्वारे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून स्थानिक तरुणांसोबत रात्रभर गस्त घातली. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र निकम यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याच्या हल्ल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच ग्रामस्थांकडून पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे. हल्ल्यात जखमी महिलेवर नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून पंचनामा केला असता याठिकाणी बिबट्याचे केस आढळून आल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तो वाघ असल्याचं देखील सांगितलं जात होतं. पण वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तो वाघ नसून बिबट्या असल्याची माहिती एबीपी माझाला दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Pune Crime : मुलीला त्रास देणाऱ्याला महिलेकडून मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
- Majha Katta : जीवनात सकारात्मकता कशी आणाल?, अध्यात्मिक गुरु मैत्रेय दादाश्री यांनी सांगितला साधा-सरळ मार्ग
- सायबर तज्ज्ञ म्हणून काम, पोलिसांना 10 खटल्यात मदत, पठ्ठ्याने बिटकॉईन घोटाळ्यात पुणे पोलिसांनाच गंडवलं!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha