(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Laxman Hake : 'सगेसोयरे अध्यादेश काढला तर...'; लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, जरांगे पाटलांवरही साधला निशाणा
Laxman Hake : सगेसोयरेच्या अध्यादेशावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर केलेल्या टीकेचाही हाकेंनी समाचार घेतला.
Laxman Hake : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयऱ्यांचा अध्यादेशासाठी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. मात्र आता सगेसोयरेच्या अध्यादेशावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर केलेल्या टीकेवरून निषेध व्यक्त केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. सगेसोयऱ्यांवरून सरकारला दिलेली मुदत उद्या 13 तारखेला संपणार आहे. 13 तारखेपर्यंत निर्णय नाही घेतला तर मराठ्यांची बैठक बोलावणार, या बैठकीतून मोठा निर्णय घेणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
...तर राज्यातील लाखो ओबीसी समाज मुंबईत धडकेल
आज सांगोला येथे लक्ष्मण हाके आले असता ओबीसी बांधवांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी सगेसोयरे अध्यादेशावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. जर सगेसोयरे अध्यादेश काढला तर राज्यातील लाखो ओबीसी समाज मुंबईत धडकेल आणि मुंबई जाम करू, तुम्ही 12 कोटी जनतेचे मुख्यमंत्री हे लक्षात ठेवा, असा थेट इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगे पाटलांवर निशाणा
बीडमधील जाहीर सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. आमचा एकमेव विरोधक छगन भुजबळ आहे. बाकी ओबीसी नेत्यांना आम्ही विरोधक मानत नाही. कारण, छगन भुजबळ या सगळ्यांचा मुकादम आहे. छगन भुजबळ तुझ्या जे जे नादी लागले, त्यांना मराठ्यांनी खुटा ठोकलाय. छगन भुजबळ जातीवादाने पिछाडलेला माणूस आहे, असे म्हणत जरांगेंनी बीडमधूनही छगन भुजबळांवर हल्लाबोल केला. यावरून लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. आमच्या 18 पगड जातीचे आरक्षण टिकविण्यासाठी लढणारे छगन भुजबळ यांना जरांगे पाटील यांनी छत्रपतींच्या पुतळ्यासमोर वापरलेल्या शिवराळ भाषेचा निषेध आहे, असे म्हणत तुम्हाला 288 जागा लढवायच्या आहेत तर लढवून दाखवा, असे आव्हान त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले आहे. आता यावर मनोज जरांगे काय पलटवार करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
मराठ्यांची अडवणूक करु नका, आता सहन करणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा