एक्स्प्लोर
मोदींना हवाहवासा गोरक्षक!
गोवंश हत्या बंदीचा कायदा झाल्यानंतर भाकड गाईंचं करायचं काय, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला. नितेश ओझा या उच्च शिक्षित तरुणाने यावर उपाय शोधला आहे.
कोल्हापूर : गोवंश हत्या बंदीचा कायदा झाल्यानंतर भाकड गाईंचं करायचं काय, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला. नितेश ओझा या उच्च शिक्षित तरुणाने यावर उपाय शोधला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव हद्दीत भाकड गाईंचा गोठा उभारून त्यांच्या गोमय आणि गोमूत्रापासून वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती करत चांगलं अर्थार्जन करण्याचं काम गेली सहा वर्ष नितेश करत आहे.
या काळात नितेशने खाद्य व्यवस्थापन चांगलं केल्याने यातल्या काही गाई गाभण गेल्या. खिल्लार देशी वंशाच्या अवघ्या 12 भाकड गाईंच्या पालनातून सुरु केलेला हा व्यवसाय नितीनने वाढवत नेला आणि सहा वर्षात आज त्याच्याकडे तब्बल 40 गाई आहेत.
नोकरी आणि व्यवसाय सोडून दूध विक्री
2003 साली बीई कॉम्प्युटरपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नितेश ओझाने फ्लिपकार्ट कंपनीत काम केलं. त्यांनतर पुण्यात स्वतःची कंपनी स्थापून व्यवसायाला सुरुवात केली. या काळात कामामुळे जीवनशैली बदलली. आहार व्यवस्थीत होत नसे. पैसे मिळत, पण सुख, शांती आणि समाधान नाहीसं झाल्याचं नितेशच्या लक्षात आलं. याच काळात 2005 मध्ये त्याच्यावर स्वदेशीचे पुरस्कर्ते राजीव दीक्षित यांच्या विचारांचा प्रभाव पडत गेला आणि त्याने पुणे सोडण्याचा निर्णय घेतला.
नोकरी आणि व्यवसाय बंद करून नितेशने 2009 साली सांगलीला येऊन देशी गाईंचं दूध विक्री करण्याचं काम सुरु केलं. याला घरातून विरोध झाला. तरीही न डगमगता दूध विक्रीचं काम सुरु ठेवलं. 2011 मध्ये मात्र त्याने प्रत्यक्ष गोपालनाला सुरुवात केली.
गोपालनाची यशस्वी सुरुवात
कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गाई, पोलिसांनी पकडलेली किंवा कोर्टामार्फत ज्या देशी गाई गोरक्षकांना दिल्या जातात, त्यातील 12 खिल्लार जातीच्या भाकड गाई नितेशने घेतल्या. आता या सांभाळण्यासाठी जागेची आवश्यकता होती. निमशिरगावजवळच्या डोंगरकडेला चार एकर जमीन भाडेतत्वावर 15 वर्षाच्या कराराने घेतली. वार्षिक 1 लाख 20 हजार रुपये भाडे तत्वावर जमीन घेतली . या ठिकाणी खिल्लार जातीच्या भाकड देशी गाईंसाठी मुक्त आणि बांधीव गोठा उभा केला.
दररोज सकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान गाई डोंगरात चरायला नेल्या जातात. सायंकाळी पाच वाजता आल्यानंतर त्यांना सकस हिरवा चारा दिला जातो. यासाठी दीड एकरात मारवेल जातीच्या गवताची लागवड करण्यात आली आहे. योग्य आहाराचं व्यवस्थापन आणि औषोधोपचार केल्याने सुरुवातीला आणलेल्या 12 गाईंपैकी सात गाई माजावर येऊन त्या गाभण गेल्या. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत नऊ गाई त्यांच्याच गोठ्यात निर्माण झाल्यात. पोलिसांकडून आणि इथं तयार झालेल्या खिल्लार गोवंशाच्या चाळीस गाई आता गोठ्यात आहेत .
विविध पदार्थांची निर्मिती आणि विक्री
सुरुवातीपासूनच असणाऱ्या भाकड गाईंच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून विविध पदार्थांची निर्मिती नितेशने सुरु केली होती. गोमयपासून गोमय भस्म, दंतमंजन, धुपकांडी, गोमय लेप, मच्छर कॉईल आणि गोमूत्रापासून गोमूत्र अर्क, घनवटी, शाम्पू अशा विविध पदार्थांची निर्मिती केली जाते.
उर्ध्वपातन प्रक्रिया करताना मातीच्या भांड्यांचा वापर करण्यात येतो. वर्षभर असं हे गोमय आणि गोमूत्रापासून पदार्थ निर्मितीचं काम सुरु असतं. वर्षभरात साधारणपणे 4 हजार लिटर गोमूत्रावर प्रक्रिया केली जाते. अतिरिक्त गाईंच्या शेणाची विक्री केली जाते.
नितेशकडे एकच खिल्लार गाय दुधात आहे. मातीच्या भांड्यात दही लावून त्यापासून मातीच्या भांड्यातच पूर्वी जसं दोरीच्या साहाय्याने रवी फिरवून लोणी काढलं जायचं, त्याच पद्धतीने लोणी काढून त्यापासून तूप तयार केलं जातं. 'जुनं ते सोनं' या म्हणीप्रमाणे तूप जितकं जुनं तशी त्याची किंमत वाढत जाते .
वेगवेगळ्या गंभीर आजारांवरील औषधी तूप निर्मिती नितेश करतो. अडीच हजार रुपये किलोपासूनचं तूप नितेशकडे उपलब्ध असतं. वर्षभरात विविध पदार्थांच्या विक्रीतून 15 लाख रुपये मिळतात. एक कुटुंब या गोठ्यात नितेशने ठेवलंय. त्यांचा खर्च, पदार्थ निर्मितीचा खर्च, जागा भाडे पट्टी आणि इतर आयुर्वेदिक वनस्पतींचा खर्च वजा जाता 10 ते 12 लाख रुपये वर्षाला यातून उत्पन्न मिळतं. देशी वंशाच्या भाकड गाईंपासून इतकं उत्पन्न यातून मिळतंय हे गोपालकांनी लक्षात घ्यायला हवं.
देशभरातील गोशाळांना नितेशचं प्रशिक्षण
देशातील गोशाळा स्वयंपूर्ण व्हाव्यात यासाठी तो महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, राजस्थान, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातील गोशाळांना प्रशिक्षण देण्यासाठी जातो. सुरुवातीच्या काळात घरातून आणि समाजातून झालेल्या विरोधातून माघार न घेता त्याने सुरु केलेलं या भाकड गाईवरचं काम देशातील गोपालकांसाठी प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे देशात गोरक्षेच्या नावावर सुरु असलेलं राजकारण पाहता अशा गोरक्षकांची देशाला खरोखर गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement