माधुरी हत्तीन परत आणण्यासाठी मोहिम, नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेष पदयात्रा, राजू शेट्टींची माहिती
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी मठातील माधुरी हत्तीणीला वनताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जनआक्रोश सुरू आहे.

Raju Shetti : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी मठातील माधुरी हत्तीणीला वनताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जनआक्रोश सुरू आहे. माधुरी हत्तीन परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मोहिम सुरु झाली आहे. येत्या रविवारी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेष पदयात्रा काढली जाणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी महादेवीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी या आत्मक्लेष पदयात्रेत सहभागी होण्याचं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मक्लेष पदयात्रा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार आहे. त्यामुळं या पदयात्रेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे.
आमदार सतेज पाटील यांच्याकडून सह्यांची मोहीम राबवण्यास सुरुवात
टोकाच्या विरोधानंतर वनताराकडे माधुरी हत्तीणीला पाठवण्यात आले. मात्र, तेव्हापासून सुरू असलेल्या एल्गार आजही कायम आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधींनी माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू केली आहे. या संदर्भात आता सह्यांची मोहीम देखील राबवली जात आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम राबवण्यास सुरु केली आहे. खासदार म्हणून धैर्यशील माने यांनी सुद्धा हा मुद्दा संसदेमध्ये मांडणार असल्याचे म्हटलं आहे.
हजारो नागरिकांनी जिओ केलं पोर्ट
आमदार विनय कोरे यांनी सुद्धा महादेवी हत्तीचा निर्णय हा अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटलं आहे. अशाच पद्धतीने जोतिबाच्या सुंदर हत्तीची रवानगी करण्यात आली. मात्र तीन वर्षांमध्ये त्या हत्तीचा मृत्यू झाला आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा मृत्यू झाला. मात्र हे समोर येऊ दिले गेलं नाही, इतकी परिस्थिती विदारक असल्याचे आमदार कोरे यांनी म्हटलं आहे. हत्तीला परत आणण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात जनचळवळ कोल्हापूरमध्ये सुरू झाली आहे. दुसरीकडे नांदणीकरांसह शिरोळ तालुक्यात सुद्धा अंबानी यांची उत्पादन न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जिओ पोर्ट करण्यात येत आहे. काल हजारो नागरिकांनी जिओ पोर्ट केल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर कस्टमर केअरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा खडसावून तुमच्या अंबानीला निरोप द्या अशा पद्धतीने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये माधुरी हत्तीचा विषय आता चांगलाच तापला आहे.
वर्षानुवर्षे सुरू असलेली जैन समाजाची परंपरा व प्रतिष्ठा खंड पाडण्याचा डाव , राजू शेट्टींची टीका
दरम्यान, माधुरीची रवानगी वनताराकडे झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी तोफ डागली आहे. ज्यावेळी धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरती पेट्रोल-डिझेल सोडण्याचे काम करत होते तेव्हापासून नांदणी मठाकडून हत्तीचे संगोपन करण्यात आलं आहे. आज अंबानींकडे पैसा व संपत्ती आहे म्हणून स्वत:च्या मुलाच्या स्वप्नासाठी वनतारा हे प्राणीकेंद्र उभारले. याठिकाणी पाळीव प्राणी इतर प्राण्यांना शिकाऊ करण्यास मदत होते, म्हणून न्यायव्यवस्थेलाही बटीक करून वर्षानुवर्षे सुरू असलेली जैन समाजाची परंपरा व प्रतिष्ठा खंड पाडण्याचा डाव या मंडळीनी रचला. संस्कृती, इतिहास, परंपरा, वारसा या सगळ्या गोष्टी समाज म्हणून गेल्या 1200 वर्षापासून नांदणी मठाकडून जपल्या जात असताना पैसा, सत्ता व संपत्ती समोर अण्णा भाऊ साठे यांच्या मताप्रमाणे न्यायव्यवस्थाही काहीकांची रखेल झाली हे खरं आहे. आता माधुरीसाठी न्याय मागायचा कुणाकडे? असा सवाल शेट्टी यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:

























