![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kartiki Ekadashi 2021 : शासनाच्या निर्णयापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्तिकी यात्रेची नियमावली जाहीर; प्रशासनाकडून तयारी पूर्ण
Kartiki Ekadashi 2021 : शासनाकडून निर्णय होण्यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी कार्तिकी यात्रेची नियमावली जाहीर केली असून प्रशासनाकडून तयारीही पूर्ण झाली आहे.
![Kartiki Ekadashi 2021 : शासनाच्या निर्णयापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्तिकी यात्रेची नियमावली जाहीर; प्रशासनाकडून तयारी पूर्ण Kartiki Ekadashi 2021 Pandharpur News Before the decision is taken by the government, the District Collector announces the rules of Karthiki Yatra Kartiki Ekadashi 2021 : शासनाच्या निर्णयापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्तिकी यात्रेची नियमावली जाहीर; प्रशासनाकडून तयारी पूर्ण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/23/1c04a179a1abfa1e83dd5a5087e445ba_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pandharpur News : कोरोना संकटामुळं संपूर्ण जग जणू ठप्प झालं होतं. कोरोना आणि त्यामुळं लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळ बंद करण्यात आली होती. तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. याशिवाय गर्दी टाळण्यासाठी काही कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडले. पंढरपूरची आषाढी वारी आणि कार्तिकी वारी (Kartiki Ekadashi 2021) यांवरही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लादण्यात आले होते.
कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून वारकरी सांप्रदायाच्या कोणत्याच यात्रा झाल्या नव्हत्या. यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्यानं कार्तिकी यात्रा घ्यावी ही वारकरी संप्रदायाची मागणी होती. यंदा कार्तिकी एकादशीचा सोहळा 15 नोव्हेंबर रोजी होत असताना अजूनही राज्य सरकारने कार्तिकी यात्रेबाबत कोणतीही घोषणा केली नाही. अशातच जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र कार्तिकी यात्रेबाबत नोटिफिकेशन काढल्यानं आता शासनाचा आदेश नसला, तरी यंदा कार्तिकी यात्रा होणार का? असा प्रश्न वारकरी संप्रदायाला पडला आहे. काल (शनिवारी) संध्याकाळी विठ्ठल मंदिरातील देवाचा पलंग काढल्यानं कालपासून देवाच्या 24 तास दर्शनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दर्शनाला हजारो भाविक दाखल झाले आहेत.
कार्तिकीबाबत प्रशासनाने सर्व तयारी जोरात सुरु केली असून यंदा आठ ते दहा लाख भाविक येण्याची शक्यता पाहून दर्शन रांग आणि इतर तयारी सुरु केली आहे. गोपाळपूर येथे दर्शन रांगेत 10 पत्रा शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून रस्त्याच्या कडेनं दर्शन रांग गोपालपूरपर्यंत उभारण्यात आलेली आहे. कोरोना आणि इतर रोगराईचा धोका पाहून चंद्रभागेमध्ये वाहते पाणी ठेवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहेत. शहर आणि मंदिर परिसरात आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. यात्रेसाठी येणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी याशिवाय मंदिरात शासकीय महापूजेच्या वेळी हजर राहणाऱ्या सर्वांची RTPCR चाचण्या केल्या जाणार असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. वारकऱ्यांचे निवासस्थळ असणाऱ्या 65 एकर भागाची सफाई पूर्ण झाली आहे. येथील 350 प्लॉटचे बुकिंग सुरु करण्यात आले आहे. एकंदर अजूनही शासनानं कार्तिकीबाबत कोणतीही घोषणा केली नसली तरी प्रशासनानं मात्र कार्तिकी होणार असल्याचं नोटिफिकेशन काढल्यानं यंदा कार्तिकी सोहळा लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार ही वारकरी संप्रदायाला प्रशासनाकडून खास दिवाळी भेट ठरणार आहे.
कार्तिकी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला; आता देवाचे राजोपचार बंद, 24 तास दर्शन व्यवस्था सुरु
कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी कालपासून देवाचे राजोपचार बंद करून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. काल (शनिवारी) पहिल्यांदाच संध्याकाळी धुपारतीनंतर विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला आहे. देवाचा पलंग निघतो म्हणजेच, देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पलंग निघत होता, मंदिरही 24 तास खुले राहायचे, मात्र मंदिरात भाविकांना प्रवेश नसायचा. यंदा कार्तिकी यात्रा होण्याची शक्यता असल्यानं कार्तिकी यात्रा काळात आजपासून 24 नोव्हेंबरपर्यंत लाखो भाविकांना 24 तास दर्शन मिळणार आहे.
काल (शनिवारी) मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर विठुरायाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीला तक्क्या लावण्यात आल्यात. चोवीस तास दर्शनाला उभारून देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे. इतर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात होत असते. ती रात्री शेजारती पर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजता मंदिर बंद होत असते. आता देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्याचसाठी दर्शन बंद राहणार असून उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र देव अखंड दर्शनासाठी उभा असणार आहे. सर्वसाधारणपणे यात्राकाळात म्हणजे 24 नोव्हेंबरपर्यंत मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडे राहणार आहे. यामुळे यात्राकाळात तासाला अडीच ते तीन हजार भाविकांचे दर्शन होत असल्याने दिवसभरात लाखभर भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)