(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांची माहिती
आलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने महाराष्ट्राला फारसा फरक पडेल असे वाटत नसल्याचे जल अभ्यासक रजनीश जोशी यांनी सांगितले.
सोलापूर : कर्नाटकातल्या विजयपूर जिल्ह्यातील आलमट्टी धरणाची उंची वाढवून जल साठवणूक करण्याची क्षमता वाढवणार असल्याचे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी व्यक्त केला. आलमट्टी धरणाच्या जलाषयासाठी बांधण्यात आलेल्या गेटच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री येडीयुरप्पा विजयपूर जिल्ह्यात आले होते. यावेळी जल सिंचनासह विविध विभागांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना आलमट्टी धरणाच्या उंचीत वाढ करून जल साठवणूक क्षमता वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला.
बागलकोट, विजापूर आणि गदग या तीन जिल्ह्यातील खासदार, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षाचे नेते यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आलमट्टी धरणाची उंची वाढवणे आणि नारायणपूर धरणाद्वारे पाच जिल्ह्यातील 6 लाख 22 हजार हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ज्यामध्ये कलबुर्गी (गुलबर्गा), विजापूर, रायचूर, यादगिर आणि बागलकोट या पाच जिल्ह्यातील सिंचनासाठी पाण्याची गरज भागविली जाणार आहे. धरणाची उंची 524.25 मीटर्स वाढवून या परिसरातील जनतेला पाणी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. सिंचनाची सोय व पिण्याच्या पाण्यासाठी आपल्या कुवतीनुसार आपण प्रयत्नशील असून सर्वांच्या सामूहिक सहकार्यातून हा निर्णय लवकरच तडीस नेऊ असा विश्वास मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान आलमट्टीच्या बॅकवॉटरचा साठा यामुळे वाढणार आहे. मागील वर्षी सांगली-कोल्हापुरात आलेल्या पुरासाठी हेच आलमट्टीचे बॅकवॉटर कारणीभूत असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रातून काय प्रतिक्रिया व्यक्त होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. याविषयी एबीपी माझाने सोलापुरातील जलअभ्यासक रजनीश जोशी यांचे मत देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने महाराष्ट्राला फारसा फरक पडेल असे वाटत नसल्याचे जल अभ्यासक रजनीश जोशी यांनी सांगितले.
"मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी मांडलेला प्रस्ताव हा आजचा नाही. साधारण 30 डिसेंबर 2010 साली आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या कृष्णा नदीच्या पाणी वाटपासंदर्भात कृष्णा नदी पाणी वाटप प्राधिकरणाने निर्णय दिला होता. 2004 साली सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ब्रिजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या प्राधिकरणाने आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे 2010 सालीच उंची वाढवण्यासाठी कायदेशीर परवानगी मिळालेली आहे, मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी हा मुद्दा आता पुन्हा चर्चेला आणला आहे. महाबळेश्वरमध्ये कृष्णेचा उगम झाल्यानंतर आलमट्टी धरणापर्यंत ही नदी जवळपास 235 किलोमीटरचा प्रवास करते. जर आलमट्टी धरणाची उंची वाढवली तर या 235 किलोमीटर अंतरावर फरक पडेल असे म्हणण्यात साशंकता वाटते' असे मत जल अभ्यासक रजनीश जोशी यांनी व्यक्त केले.
मात्र आलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने कृष्णा नदी काठच्या काही गावांवर मात्र नक्की परिणाम होईल असे मत देखील रजनीश जोशी यांनी व्यक्त केले. आलमट्टी धरण हे जरी विजयपूर जिल्ह्यात असले तरी त्याचा जलाशय हा बागलकोट जिल्ह्यात आहे. त्यामुळे बागलकोटमधील जवळपासच्या गाव हे बुडीत क्षेत्रात जातील. त्यामुळे धरणाची उंची वाढवताना स्थानिकांचा देखील विरोध होण्याची शक्यता असल्याचे मत देखील जल अभ्यासक रजनीश जोशी यांनी व्यक्त केले. "गेल्या अनेक दिवसांपासून आलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे महाराष्ट्रात पूर येतो अशी चर्चा सुरु आहे. 2005 साली देखील राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अभ्यासाअंती आलमट्टी धरणामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली यात कोणतेही तथ्य आढळले नाही. त्यामुळे पुन्हा याच मुद्यावर चर्चा करणे हा वेळेचा अपव्यय आहे. आपल्या राज्यात पूर परिस्थिती का निर्माण होते यावर खरतर विचार होणे गरजेचे आहे. याबाबत शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे", असे मत देखील जलअभ्यासक रजनीश जोशी यांनी व्यक्त केले.