मुन्नाभाईमधल्या पप्पांसारखाच बेळगावच्या आजींचा थक्क करणारा कॅरम खेळ!
'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटातील डॉ. रुस्तम पावरीचे कॅरम खेळणारे पप्पा आठवतात का? वयोवृद्ध पप्पांचा खेळ प्रेमात पाडणारा आहे. बेळगावातही अशाच एक 92 वर्षांच्या आजी आहेत, ज्यांना सफाईदारपणे कॅरम खेळताना पाहून सगळेच थक्क होतात
बेळगाव : संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटातील डॉ. रुस्तम पावरीचे कॅरम खेळणारे पप्पा आठवतात का? वयोवृद्ध पप्पा कॅरम सराईतपण खेळतातच पण खेळातील राणी मिळवणं याकडे त्यांचा ओढा असतो. 'रानी तो पप्पा नी' हा त्यांचा डॉयलॉगही तेवढाच फेमस आहे. अशाच एक आजी बेळगावात आहेत. कॅरम बोर्डवर त्यांचा सफाईदार खेळ पाहून सगळेच थक्क होतात. कमल नारायण कंग्राळकर असं या आजींचं नाव असून त्या 92 वर्षांच्या आहेत.
आयुष्याच्या संध्याकाळी म्हणजे ज्येष्ठ नागरिक झाल्यावर बहुतेकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होतो. कोणाच्यात मिसळायचे नाही, सगळ्या गोष्टीकडे निर्विकारपणे पाहायचे, कोणत्याही कृतीतून आनंद घ्यायचा नाही अशी वृत्ती बळावते. पण काही जणांचा उत्साह, जीवनात आनंद घेण्याची, शोधण्याची वृत्ती वय झाली तरी कायम असते. अशा व्यक्ती अगदी अखेरपर्यंत आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीत रस घेतात आपले छंद जोपासतात. त्यांचा सहवास आजूबाजूच्या व्यक्तींना देखील उत्साह वाढवणारा आणि प्रेरणादायी ठरतो. साधारणपणे वयाची साठी ओलांडल्यावर माणसाचा उत्साह कमी होतो, पण बेळगावमधील 92 वर्षाच्या कमल नारायण कंग्राळकर या आजीबाईंचा उत्साह तरुणांना देखील लाजवणारा आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्या अत्यंत सफाईदारपणे कॅरम खेळतात.
बेळगावच्या भडकल गल्लीत राहणाऱ्या या 92 वर्षाच्या आजी आजही आपली मुले, नातवंडे, पणतवंडे यांच्यासोबत कॅरम खेळतात. त्यांचे कॅरम खेळणे खरोखर थक्क करणारे आहे. वयाच्या 92 व्या वर्षी बहुतेकांचे हातपाय लटपटतात. पण या आजी अत्यंत सफाईदारपणे स्ट्रायकर हाताळतात.
लग्नानंतर त्या कॅरम खेळायला शिकल्या. पण पतीच्या निधनानंतर त्यांचे कॅरम खेळणे बंद झाले. लॉकडाऊन कालावधीत त्या आपल्या मुलगी राजश्री प्रमोद जाधव यांच्या घरी राहायला गेल्या. तिथे त्यांनी नातवंडे कॅरम खेळत असताना पाहून आजींनीही स्ट्रायकर हातात घेतला आणि त्यांचा खेळ पाहून घरातील सगळेच थक्क झाले. 92 व्या वर्षी देखील त्या स्ट्रायकरने कॅरम बोर्ड वरील आपल्याला हवी ती कॉइन मिळवतात. आजही त्यांची स्मरणशक्ती उत्तम आहे. या आजींचा उत्साह निश्चितच कौतुकास्पद आहे.
आजही त्या मराठीत खणखणीत बोलतात. सहावीपर्यंत शिकलेल्या आजी आजही आपल्या बालपणीच्या आठवणी व्यवस्थित सांगतात. कमल कंग्राळकर या माझ्या पत्नीच्या आजी. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचा उत्साह कौतुकास्पद आहे. त्यांचा उत्साह पाहून आम्हाला प्रेरणा मिळते. त्यांचे कॅरम खेळणे पाहिले तर थक्क व्हायला होते, असे दिनेश पाटील यांनी सांगितले.