Kalyan Dombivli: तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला, टँकरचे दर प्रचंड वाढवले, कल्याण डोंबिवलीत पालिकेकडूनच नागरिकांची लूट, नागरिकांचा संताप
नागरिकांना रात्री तीन वाजेपर्यंत टँकरच्या रांगेत उभं राहून पाणी भरावं लागलं. अनेक भागांत वृद्ध, महिला, लहान मुलांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागले.

Kalyan: कल्याण पश्चिमेतील मुख्य जलवाहिनी रविवारी सकाळी फुटल्यानंतर संपूर्ण कल्याण-डोंबिवली शहरात पाणीपुरवठा कोलमडला. या घटनेनंतर नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने तक्रारी केल्या होत्या. मात्र महापालिकेने तातडीने उपाययोजना करण्याऐवजी तब्बल तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला.ही जलवाहिनी बारावे जलशुद्धीकरण केंद्राशी जोडलेली असून ती काँक्रीट रस्त्याखालून गेल्याने अधिकाऱ्यांना फुटलेल्या भागाचा शोध घेण्यासाठी चार ते पाच फूट खोल रस्ता फोडावा लागला. अखेर रात्री उशिरा जलवाहिनी फुटलेली सापडली. या दुरुस्तीच्या कालावधीत महापालिकेने नागरिकांना मोफत पाणीपुरवठा करण्याऐवजी तब्बल 400 रुपये दराने टँकर विक्री सुरू केली. महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या तीन दिवसांत 500 हून अधिक टँकर विकण्यात आले.
नागरिकांना त्रास, पालिकेकडून टँकर विक्री सुरू
रविवारी जलवाहिनी फुटल्यानंतर संपूर्ण कल्याण-डोंबिवलीकरांचा पाणीपुरवठा बंद झाला.ही पाईपलाईन बारावे जलशुद्धीकरण केंद्राशी जोडलेली असून ती काँक्रीट रस्त्याखालून गेल्यामुळे तिचा शोध घेणे कठीण झाले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चार-पाच फूट खोल रस्ता फोडून अखेर जलवाहिनीचा फुटलेला भाग शोधून काढला. या दरम्यान सोमवारी पाणीपुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आला होता. या कालावधीत महापालिकेने नागरिकांना मदत करण्याऐवजी, प्रतिटँकर 400 रुपयांना विक्री सुरू केली.तीन दिवसांत तब्बल 500 पेक्षा अधिक टँकर विकण्यात आले.
खासगी टँकर मालकांनीही केली लूट; नागरिकांमध्ये संताप
खासगी टँकर मालकांनी याच संधीचा गैरफायदा घेत दर 1000 ते 1500 रुपयांपर्यंत वाढवले. सामान्य नागरिकांचे आर्थिक खिसे रिकामे होत असतानाही महापालिका मदतीस येण्याऐवजी टँकर विकून नफा मिळवत असल्याचे चित्र होते. पाणीपुरवठा विभागातील काही अधिकारी या संकटकाळात संपर्कबाह्य राहिले. तर काहींनी केवळ “दुरुस्ती झाली असून काही भागात पाणी सुरू आहे” असे सांगून वेळकाढूपणा केला. नागरिकांना रात्री तीन वाजेपर्यंत टँकरच्या रांगेत उभं राहून पाणी भरावं लागलं. अनेक भागांत वृद्ध, महिला, लहान मुलांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागले.
पालिकेवर टँकर माफियांना पाठीशी घालण्याचा आरोप
महापालिकेने नागरिकांना आवश्यक सुविधा न देता टँकर विक्रीतून नफा मिळवल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे “पालिका टँकर माफियांच्या बाजूने उभी आहे का?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.करदात्यांच्या पैशातून चालणारी यंत्रणा नागरिकांच्या अडचणी सोडवण्याऐवजी त्यांच्यावरच आर्थिक बोजा टाकते आहे, यामुळे महापालिकेच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा:























