विधवा सूनेचे अनैतिक संबंध असल्याचा राग, सून आणि प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडलं
जालन्यात प्रेमी युगुलाची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या करण्यात आली. विधवा सुनेचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून सासऱ्याने आपल्या मुलाकरवी सून आणि तिच्या प्रियकराची हत्या घडवून आणली.
जालना : विधवा सुनेच्या अनैतिक संबंधाना वैतागून सासऱ्याने मुलाकरवी सून आणि तिच्या प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील चापडगाव शिवारत घडली आहे. भागवत प्रल्हाद हरबक आणि मारिया विनोद लालझरे अशी मृतांची नावं आहेत.
मारियाचा पती विनोदने दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. भागवत हरबक हा लालबावटा संघटनेचा चापडगावचा अध्यक्ष होता. लालबावटा संघटनेचा बुधवारी (28 ऑक्टोबर) कुंभारपिंपळगावला मेळावा होता. त्यामुळे भागवत आणि मारिया हे दोघे दुचाकीवर मेळाव्याला गेले. पण दीड तासानंतर भागवतच्या दुचाकीचा अपघात झाला अशी बातमी कुटुंबियांना समजली. जखमी अवस्थेत भागवतला घेऊन जाताना त्याने आईला सांगितले की विकास बथवेल लालझरे याने मुद्दामहून आमच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तर मारियाचा रुग्णालयात नेतानाच मृत्यू झाला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, भागवत हरबक आणि मारिया लालझरे यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तर मागील सहा महिन्यांपासून दोघेही एकत्र राहत होते. याचा राग मारियाचे सासरे आणि दीर यांना होता. दोघांचे संबंध अनैतिक असल्याचा राग मनात ठेवून बथवेल लालझरेच्या सांगण्यावरुन विकास बथवेल लालझरेने आपल्या ट्रॅक्टरने मारिया आणि भागवत यांना चिरडूनलं. यात दोघांचाही मृत्यू झाला.
यानंतर भागवत हरबकच्या आईच्या फिर्यादीवरुन मारियाचा सासरा बथवेल लालझरे आणि मुलगा विकास लालझरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही अटक केली आहे.