ऐन दिवाळीच्या दिवशीच दोन वायरमनचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू; जळगावच्या जामनेरमधील खळबळजनक घटना
वीज तार जोडण्यासाठी गेलेल्या दोन वायरमनचा वीजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गावात घडली.
Jalgaon Jamner News: एकीकडे दिवाळीचा सण सर्वत्र आनंदात साजरा केला जात असताना दुसरीकडे वीज तार जोडण्यासाठी गेलेल्या दोन वायरमनचा वीजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गावात घडल्याने खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर गावात एका शेत शिवारात वीज तार तुटल्याची घटना घडली होती. ही तुटलेली तार जोडण्यासाठी गेलेल्या गणेश नेमाडे आणि सुनील परदेशी हे दोघे वायरमन गेले होते. या दोन्ही वायरमनला शेतात पडून असलेली वीज तार लक्षात न आल्याने दोघांनाही विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या दोघांचा मृत्यू होण्यापूर्वी शेतात चरण्यासाठी गेलेल्या एका म्हशीचा देखील विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर दोघांचे मृतदेह जामनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता या ठिकाणी मृतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केल्याचं पाहायला मिळाला. मंत्री गिरीश महाजन यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. ऐन दिवाळीच्या दिवशीच दोन वायरमनचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिवाळीत विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी दिवाळी असूनही महावितरणचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. कुठे बिघाड झाला तरी शक्य तेवढ्या कमी वेळात विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला जात आहे. अशात ऐन सणात दोन कुटुंबावर शोककळा परसली आहे.
ही बातमी देखील वाचा- दोन महिन्यांचा संसार उद्धवस्त, विजेच्या खांबाला चिकटून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू