जयदीप आपटेचे वकील सिंधुदुर्गात दाखल, स्ट्रॅटेजी तयार, जामीन मिळवण्यासाठी पडद्यामागे हालचाली? जयंत पाटलांचा गंभीर आरोप
उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात मला काही फार माहीत नाही. काही कारणास्तव ते आले नसतील, असे जयंत पाटील म्हणाले.
सांगली : जयदीप आपटे (Jaydeep Apte) सरकारचा नातेवाईक आहे, आपटेला जामीन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) केली आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला ताब्यात घेतलंय. दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला काल पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलंय. त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
जयंत पाटील म्हणाले, जयदीप आपटे हा सरकारचा नातेवाईक आहे. कंत्राटही त्याला दिलं आता जामीनही त्याला देण्यासाठी प्रयत्न करतील. त्याच्याकडे पात्रता नसतानाही त्याला काम देण्यात आलं आहे. सरकारला हे भोगाव लागेल तसेच याची किंमत मोजावी लागेल.
उद्धव ठाकरे महाविकासआघाडीच्या कार्यक्रमाला गैरहजर, जयंत पाटील म्हणाले...
सांगलीतील कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात मला काही फार माहीत नाही. काही कारणास्तव ते आले नसतील. राजकीय कार्यक्रम नसून व्यक्तिगत कार्यक्रम आहे.
जयदीप आपटेचे वकील सिंधुदुर्गात दाखल, स्ट्रॅटेजी तयार
मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटने संदर्भात असलेला मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना दुपारी 3 वाजताच्या सुमारास मालवण दिवाणी न्यायालयात हजर केले जाणार आहे. चेतन पाटील यांची पोलीस कोठडी आज संपत असून पोलिस तपास करायचा असल्यास त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. तर मुख्य आरोपी जयदीप आपटे याची तपासाअंती चार्जशीट दाखल केली जाणार त्यात जयदीप आपटे याची चौकशीत काय काय अपेक्षित आहे त्यानुसार पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. तर जयदीप आपटेचे वकील गणेश सोवनी मालवण न्यायालय परिसरात दाखल झाले आहे. मुंबईवरून विमानाने ते गोव्यात आले. तिथून कारने मालवणमध्ये दाखल झाले आहे. त्यांच्या सोबत स्थानिक वकील अॅड राजू परुळेकर ही असणार आहे.
राज्य दिवाळखोरीकडे चालले : जयंत पाटील
आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्य दिवाळखोरीकडे चालले आहे. जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. तिजोरीत पैसे शिल्लक नाही. सरकारच्या खात्यात पैसे नसले तरी आपण मानवतावादीदृष्ट्या आम्ही मदत करायचे. मात्र या सरकारने आता हे सर्व बंद केले आहे. हे सरकार रस्ते बांधून पैसे काढत आहेत. मागणी नसताना ही रस्ते बांधले जात आहेत, असाच शक्तीपीठ महामार्ग आहे.
पुढच्या चार ते पाच वर्षांमध्ये कोणालाच बिल मिळणार नाही : जयंत पाटील
विद्यार्थी शिष्यवृत्तीवर जयंत पाटील म्हणाले, सर्वच विभागांना याचा फटका बसणार आहे. विद्यार्थ्यांच्या ही शिष्यवृत्त्या थांबवलेल्या आहे. कंत्राटदारांचे पैसेही थकलेले आहेत. जर कंत्राटदारांना आत्महत्या करायची नसेल तर त्यांनी काम थांबवलं पाहिजे. पुढच्या चार ते पाच वर्षांमध्ये कोणालाच बिल मिळणार नाही.
जयदीप आपटे हा सरकारचा नातेवाईक : जयंत पाटील
हे ही वाचा :
जयदीप आपटेचा वकील म्हणतो पकडलं नाही, सरेंडर केलं; पोलिसांनी दावा फेटाळला!