Maharashtra Rain : विदर्भ वगळता राज्यात तापमानात वाढ, मुंबईसह कोकणातील पावसाचा जोर ओसरला
मुंबईसह कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरचा पूर्वीचा असलेला जोरदार पावसाचा अंदाजही आता ओसरत चालला आहे.
Maharashtra Weather : सध्या राज्यात पावसानं (Rain) दडी मारल्यानं विविध भागात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची (Farmers) पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशात स्थिती मुंबईसह कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरचा पूर्वीचा असलेला जोरदार पावसाचा जोर आता ओसरत चालला आहे. येत्या रविवारपासून (3 सप्टेंबर) पुढील आठवडाभर म्हणजे 10 सप्टेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचीच शक्यता जाणवत असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
सध्या महाराष्ट्रात विदर्भ वगळता दुपारच्या कमाल तापमानातही सरासरी पेक्षा दोन डिग्रीने वाढ झाली आहे. पुढील आठवडाभर म्हणजे कदाचित 10 सप्टेंबरपर्यंत ही स्थिती टिकून राहू शकते. त्यामुळं उष्णतेत झालेली सध्याची अतिवाढ आणि वाऱ्याची शांतता यामुळं खरीप पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती
बैल पोळा सणाच्या आत म्हणजे सप्टेंबर 11 ते 14 दरम्यान पहिल्या आणि अनंत चतुर्दशीच्या आत म्हणजे 25 ते 29 सप्टेंबर दरम्यानच्या दुसऱ्या आणि घटस्थापनेच्या आत म्हणजे 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यानच्या तिसऱ्या अश्या एकूण तीन पावसांच्या आवर्तनापैकी एखाद्य-दुसऱ्या आवर्तनातून महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले. कारण बंगालच्या उपसागरात आज चार विविध ठिकाणी, विविध उंचीच्या पातळीवर चक्रीय वाऱ्यांची स्थिती जाणवत आहे. शिवाय पाच दिवसानंतर म्हणजे चार सप्टेंबर दरम्यान अजून एक चक्रीय वारा प्रणाली स्थिती तिथे तयार होण्याची शक्यता जाणवत आहे. या सर्व घडामोडी देशात सप्टेंबरच्या पावसासाठी अनुकूल ठरु शकतात असे वाटत आहे.
सध्या पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सौराष्ट्र व कच्छ सहीत संपूर्ण वायव्य भारतात लागोपाठ अनेक दिवस पावसाची गैरहजरी आहे. आर्द्रतेच्या टक्केवारीतील होणारी हळूहळू घसरण, आणि निरभ्र आकाश यासारखे वातावरणीय बदल नकळत परतीच्या पावसाचेच वेध दर्शवू लागल्याचे खुळे म्हणाले. पण सध्या राज्यावर एल निनोचे सावट असल्याचे खुळे म्हणाले.
राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाची मोठी तूट
राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली मोठी तूट निर्माण झाली आहे. सरासरीच्या उणे 20 टक्क्यांहून अधिक तूट आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहेत. 1 जूनपासून जालन्यात फक्त 54 टक्के पाऊस, सांगली जिल्ह्यात फक्त 56 टक्के पाऊस, अमरावतीत सरासरीच्या फक्त 69 टक्के पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिकं माना टाकू लागली आहेत. त्यामुळ आता पावसाची गरज आहे, अन्यथा पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या: