(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सॅनिटायझर, मास्क चढ्या दराने विकल्यास कडक कारवाई करणार, अन्न-औषध प्रशासनाचा इशारा
ठाण्यात अन्न औषध प्रशासन आणि ठाणे केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. गरज असेल तरच आणि तेही डॉक्टरांच्या सल्याशिवाय मास्क घेऊ नये अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या.
भिवंडी : सध्या मेडिकलमध्ये सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे, तर मास्कदेखील चढ्या भावाने विकले जात आहेत. परंतु असे काही प्रकार घडत असतील त्या मेडिकल चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. यापुढेही जाऊन त्याचे मेडिकल स्टोअर या कोरोना व्हायरसचा धोका कमी होत नाही, तोर्पयत बंद ठेवले जाईल, असा इशाराही अन्न औषध प्रशासनाचे (कोकण विभाग) सह आयुक्त विराज पौवणीकर यांनी दिला आहे.
ठाण्यात अन्न औषध प्रशासन आणि ठाणे केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोकण विभागातील सर्व शासकीय रुग्णालये, दवाखान्यांमध्ये सध्या 21 लाखांच्या आसपास मास्क उपलब्ध आहेत. परंतु आपल्याला गरज असेल तरच आणि तेही डॉक्टरांच्या सल्याशिवाय मास्क घेऊ नये अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
स्वत:ची काळजी घेताना हात धुण्यासाठी केवळ सॅनिटायझरच आवश्यक आहे, असं नाही. तर त्याऐवजी साधा साबनही उपयोगी पडणारा आहे. त्यामुळे उगाचाच सॅनिटायझरची मागणी करुन त्याचा तुटवडा निर्माण करणे अयोग्य असल्याचंही त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसात मेडिकलमधून मुबलक सॅनिटायझरचा साठा उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे मास्क किंवा सॅनिटायझर विकत घेतांना किंवा विकताना बिल आवश्यक घ्यावं. जेणेकरुन तुमच्याकडून जास्तीचे पैसे घेतले जाणार नाहीत. याशिवाय आमच्या विभागामार्फत सध्या 450 च्या आसपास मेडिकलची पाहणी करण्यात आली आहे. तसेच यापुढेही साध्या वेशातील कर्मचाऱ्यांकडून ती पाहणी सुरुच आहे. त्यामुळे असा फसवणुकीचा प्रकार आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच सध्या या आजारावर कोणत्याही प्रकारचे योग्य असे उपचार नाहीत, त्यामुळे सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून जे काही उपचार सुचवले जात आहेत, त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
संबंधित बातम्या- Coronavirus | राज्यातील एकूण रुग्ण संख्या 39 वर, मुंबईत एका तीन वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट
- coronavirus | कोरोनाची मंत्रालयात धडक!, सरकारकडून मंत्रालयात नो एन्ट्रीचे आदेश
- Coronavirus | सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी तसंच धार्मिक उत्सव बंद करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- Coronavirus | राज्यातील सर्व विद्यापीठं, महाविद्यालयं बंद, नियोजित परीक्षाही 31 मार्चनंतर