मानव आणि वन्यप्राणी संघर्षाची स्थिती दिवसेंदिवस बिकट! अहवालातील कटू सत्य...
मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षाची स्थिती दिवसेंदिवस बिकट धारण करत असून वेगवेगळ्या कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे.
मुंबई : मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्षाची स्थिती दिवसेंदिवस बिकट धारण करत असून वेगवेगळ्या कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा आकडा वाढत असताना दुसरीकडे त्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्याही वाढच असून याचा सर्वाधिक धोका वन्यजीवांनाअसल्याचा अहवाल 'डब्ल्यूडब्ल्यूएफ' आणि संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण कार्यक्रम यांच्या माध्यमातून समोर आला आहे.
वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अन्नपाण्याच्या शोधात भटकत असलेले प्राणी किंवा गुरांची शिकार करणारे बिबट्या ही उदाहरणे लक्षात घेतल्यावर मानव-प्राणी संघर्षाचा अशा प्राण्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा माणूस स्वसंरक्षणार्थ किंवा झालेल्या नुकसानीचा बदला घेण्यासाठी प्राण्यांना ठार करतो असे दिसून येते. अशा संघर्षातून ती प्रजात नष्ट होण्याचीही भीती असते.
वन्यप्राणी आणि मनुष्यातील संघर्ष वेळोवेळी उफाळून येतो. यवतमाळमधील अवनी वाघीणीची क्रूरपणे हत्या, मध्यप्रदेशात विद्युत प्रवाह असलेल्या तारेच्या स्पर्शाने वाघांचा मृत्यू, हत्तीचा विषप्रयोगाने झालेला मृत्यू या घटना वन्यजीवप्रेमींना चटका लावून गेल्या. सर्वाधिक व्याघ्र मृत्यू झालेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश पहिल्या स्थानीतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. नऊ वर्षांत देशाने 857 वाघांना गमाविले असनू त्यातील 301 वाघ हे शिकाऱ्यांचे बळी ठरले आहेत.
भारतातील एकूण वाघांच्या संख्येपैकी सुमारे 35 टक्के वाघ हे संरक्षित क्षेत्राबाहेर आहेत. मृत्यू पावलेले बहुतांशी वाघसंरक्षित क्षेत्राबाहेर मारले गेले आहे. त्यामुळे नैसर्गिक अधिवासाचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. अन्याथा मानव-वन्यजीवसंघर्षात वन्यप्राण्यांसाठीचा धोका हा दिवसेंदवस वाढत जाईल.
अलीकडच्या काळात वन्यप्राण्यांच्या केल्या जाणाऱ्या शिकारीला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. तस्करीतून मिळणाऱ्या पैशांचे प्रमाण जास्त त्यामुळे शिकारीचे प्रमाण वाढले आहे. जंगल परिसरात शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांकडून होणारा रासायनिक खतांचा वापर यामुळे देखील वन्यप्राण्यांचा मृत्यू होत आहे.
भारतात विकासाच्या नादात मानव- प्राणी संघर्ष वाढत आहे. याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक अधिवास आणिहोऊ घातलेला विकास यातील असमतोल. वन्यजीवांचे मृत्यू किंवा त्यांच्यावर होणारे हल्ले अनैसर्गिक असले तरी त्यामागील कारणे नैसर्गिक आहेत. कारण मानव आणि वन्यजीव दोघांकरीता हा संघर्ष जगण्याचा आहे.