Ajit Pawar NCP : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
Ajit Pawar NCP : शरद पवार गटात प्रवेश करू इच्छित असलेल्या अजित पवार गटातील नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज विधान भवनबाहेर एका हाॅटेलमध्ये भेट घेतली.
Ajit Pawar NCP : लोकसभा निवडणुकीत झटका बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही अजित पवार गटाला झटका बसण्याची चिन्हे आहेत. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 17 ते 18 नगरसेवक पुढील आठ दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अजित पवारांना बालेकिल्ल्यात तगडा झटका बसण्याची चिन्हे आहेत. युवक राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही कार्यकर्ते सुद्धा पक्षप्रवेश करणार आहेत.
शरद पवार गटात प्रवेश करू इच्छित असलेल्या अजित पवार गटातील नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विधान भवनबाहेर एका हाॅटेलमध्ये भेट घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे आमदार, माजी नगरसेवक अजित पवारांसोबत कायम राहिले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर बरंच पुलाखालून पाणी गेलं आहे. चिंचवड आणि भोसरीला भाजप आमदार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अनेकांना राजकीय भवितव्याची चिंता आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याने खळबळ उडाली आहे.
गतवर्षी चिंचवड पोटनिवडणूक लढवलेल्या नाना काटे यांनी काहीही झाले तरी निवडणूक चिन्हावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यात शरद पवार यांनी सर्वांसाठी दरवाजे खुले ठेवण्याची घोषणा केली होती. आता याच दारातून नाना काटे घरी परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या ऑफरनुसार तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार का, असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यांनी चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.
नाना काटे विधानसभा निवडणूक लढवणार?
नाना काटे म्हणाले, "मी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमची मजबूत पकड आहे. महायुतीचे तिकीट भाजपकडे गेले तरी मी ही निवडणूक लढवणार आहे. मी अजितदादांची भेट घेतली होती, आणि त्यांनी संकेत दिले आहेत. माझ्या मते तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करत राहावे, कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची याचा निर्णय त्यावेळीच घेतला जाईल.
शरद पवार गटात सामील होणार का, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी हसून योग्य वेळी सांगेन, असे सांगितले, त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. शरद पवार यांच्या पक्षाकडून तिकीट मिळाल्यास निवडणूक लढवणार या प्रश्नावर नाना काटे म्हणाले की, सध्या कोणताही निर्णय झालेला नाही.
सध्या भाजपचे दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या चिंचवडच्या आमदार आहेत. नुकतेच नाना काटे यांनी लक्ष्मण जगताप यांचे खरे वारसदार असल्याचे सांगत आगामी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर दुसरीकडे लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नाना काटे यांनी मागील विधानसभा पोटनिवडणूक लढवली होती, त्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
इतर महत्वाच्या बातम्या