(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सिद्धेश रामदास कदम अजूनही युवासेना कोअर कमिटीत कसे?' शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचा युवासेना सचिवांना सवाल
रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम शिवसेना शिंदे गटात असून ते दररोज शिवसेना ठाकरे गटावर जहरी टीका करत आहेत. मात्र त्यांचे दुसरे पुत्र आजही ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारणीत आहे.
मुंबई : शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर अनेक आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाले. मात्र असे असले तरी पक्षांतर्गत कलह सुरुच आहे. रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे देखील शिंदे गटात गेले आहेत. मात्र रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे दुसरे पुत्र ठाकरे गटाच्या युवासेनेच्या (Yuva Sena) कोअर कमिटी कार्यकारणीत आहे. त्यामुळे त्यांना कार्यकारिणीत अजूनही स्थान कसे काय? सवाल उपस्थित होत आहे.
शिवसेना ठाकरे गटाची काल शिवसेना भवनात दसरा मेळावा (Dasara Melava) पूर्व तयारीसाठी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. याच बैठकीत सिद्धेश रामदास कदम अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारिणीत कसे? असा प्रश्नं विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी उपस्थित केला.
शिवसेना नेते अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनीही आश्चर्य व्यक्त करत युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना जाब विचारला? यावर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांनी यावर लवकरच निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारुन घेऊ, असे उत्तर दिले. हे उत्तर एकूण उपस्थित विभागप्रमुख चांगलेच भडकले.
सध्या रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम शिवसेना शिंदे गटात असून ते दररोज शिवसेना ठाकरे गटावर जहरी टीका करत आहेत. अशा प्रसंगी रामदास कदम यांचे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदम शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेत अजून कसे काय कार्यरत आहेत? त्यांची हकालपट्टी अजून का केली नाही? असे प्रश्न विभागप्रमुखांनी विचारुन युवासेनेच्या कार्यपद्धतीवर राग व्यक्त केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर पहिल्यांदाच दसरा मेळावा होणार असून ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्या आधी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणण्यात येणार असून लाखोंची गर्दी जमवण्याची तयारी सुरु आहे. शिंदे गटाचे आमदार आणि स्थानिक नेत्यांची त्याची जोरदार तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे.