Youth Death : मित्रांनी रंग लावू नये म्हणून इमारतीच्या गच्चीत लपला, अन् घात झाला...
धुळवडीच्या दिवशीच अंबरनाथमध्ये धक्कादायक घटना घडली. मित्रांनी रंग लावू नये, म्हणून इमारतीच्या गच्चीत लपलेल्या एका तरुणाचा गच्चीतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
Youth Death : धुळवडीला मित्रांनी रंग लावू नये, म्हणून इमारतीच्या गच्चीत जाऊन लपलेल्या एका तरुणाचा गच्चीतून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना अंबरनाथमधील शिवाजीनगर परिसरात घडली. या घटनेमुळं परिसरात शोककळा पसरली आहे. सुरज मोरे (वय 26) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख करत आहेत.
अंबरनाथच्या शिवाजीनगर भागात सुरज मोरे हा 26 वर्षीय तरुण वास्तव्याला होता. धुळवडीच्या दिवशी सुरज हा त्याचा भाऊ तुषार मोरे याच्यासह दुपारी 1 च्या सुमारास अविनाश पाटील या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर नव्याने झालेल्या इमारतीत अविनाश वास्तव्याला असून याच इमारतीखाली हे तिघे बोलत उभे होते. यावेळी त्यांच्याच परिसरातले इतर काही मित्र तिथून जात असताना त्यांना सूरज आणि तुषार दिसल्यानं ते त्यांना रंग लावण्यासाठी आले. यावेळी सूरज आणि तुषार हे दोघेही इमारतीत पळाले. तुषार हा पहिल्या मजल्यावर लपला, तर सूरज हा थेट गच्चीत जाऊन लपला. यावेळी तुषारला मित्रांनी पकडून खाली आणलं. मात्र, त्याला रंग लावत असतानाच अचानक सूरज हा गच्चीतून खाली पडला. इमारतीच्या टेरेसवर असलेल्या डक्टमधून सूरज खाली पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्याच्या भावाने आणि मित्रांनी तातडीने आधी अंबरनाथच्या एका खासगी रुग्णालयात, तिथून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात नेलं. मात्र, दुपारी साडेतीनच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे ऐन सणाच्या दिवशी मोरे कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, शुक्रवारी धुलीवंदन सणाचा आनंद लुटून घरी आलेल्या एका तरुणाचा अचानक दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आशुतोश संसारे (वय 27) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. बदलापूरमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. आशुतोषच्या मृत्यूचे कारण समोर आले नाही. बदलापूरच्या हेंद्रपाडा परिसरात शुभदान ही सोसायटी असून इथे होळी-धुलीवंदनानिमित्त जल्लोष सुरू होता. यावेळी आशुतोष संसारेदेखील आपल्या मित्रांसह संगीताच्या तालावर सगळे नाचत होते. नाचून झाल्यानंतर आशुतोष घरी गेला. त्यावेळी त्याच्या छातीत दुखू लागले. आशुतोषला होणाऱ्या वेदना पाहता, त्याच्या पत्नीने मदतीसाठी शेजाऱ्यांकडे धाव घेतली. शेजाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या: