(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hijab Day: हिजाबच्या समर्थनार्थ राज्यभरात निदर्शनं, हजारोच्या संख्येने महिलावर्ग रस्त्यावर
Hijab Day: कर्नाटकमध्ये सुरुवात झालेला हिजाब वाद आता राज्यभर पसरला आहे. राज्यातील काही ठिकाणी आज हिजाब दिवस म्हणून हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.
Hijab Day: कर्नाटकातील एका महाविद्यालयात सुरु झालेलं हिजाब प्रकरण (Hijab Controversy) आता देशभर पोहोचलं आहे. शालेय शिक्षणसंस्थांमध्ये येताना शाळेच्या गणवेशाशिवाय इतर प्रकारचा पोशाख परिधान करु नये, अशा सूचना कर्नाटक उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. पण या निर्णयाशी सहमत नसणाऱ्य़ा हजारो मुस्लीम महिला आता रस्त्यावर उतरु लागल्या आहेत. आज (शुक्रवारी) मालेगावमध्ये 'हिजाब दिन' (Hijab Day) पाळण्यात आला असून सर्व महिला आज बुरखा परिधान करतील अशी माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान मालेगावसह राज्यातील अनेक भागात आज हिजाब दिवस पाळत हजारोच्या संख्येने महिला रस्त्यावर हिजाब परिधान करुन उतरल्या. यावेळी नांदेड, परभणी, सोलापूर या जिल्ह्यांसह कर्नाटकच्या उद्गीर येथे महिला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.
कर्नाटकच्या एका महाविद्यालयात हिजाब बंदी करण्यात आल्यानंतर मुस्कान नावाची एक विद्यार्थीनी हिजाब परिधान करत महाविद्यालयात आली. यावेळी अनेकजण या विरोधात घोषणा देत होते, पण मुस्कानने देखील इस्लाम धर्माच्या घोषणा दिल्या. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटू लागले. गुरुवारी मालेगावातल्या मैदानात हजारो महिलांनी एकत्र येऊन हिजाबचं समर्थन केलं. या मेळाव्यात मौलानांनी महिलांना मार्गदर्शन केलं. ज्यानंतर आज म्हणजेच शुक्रवारी हिजाब दिनानिमित्त हिजाब परिधान करूनच घराबाहेर पडण्याचा निर्णय या महिलांनी जाहीर केला. ज्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांत आज हिजाब परिधान करत मुस्लीम महिला रस्त्यावर उतरल्या.
मालेगावच्या महापौर ताहेरा शेख यांचा हल्लाबोल
हिजाब दिवस पाळण्याची घोषणा झालेल्या मालेगावात, 'हिजाबमध्ये राहूनच आम्ही शिक्षण घेऊ. देशभरात कुठेही मुस्लिम समाजावर निर्बंध लादले तर पूर्ण देश जागा होईल' असे वक्तव्य मालेगावच्या महापौर ताहेरा शेख यांनी केले. कर्नाटक सरकारच्या निर्णयाला आमचा विरोधच आहे. मुस्लिम समाजात हिजाब घातल्याशिवाय घराबाहेर पडू शकत नाही. हिजाबमध्ये राहूनच आम्ही शिक्षण घेऊ. आम्ही काल महिला जमलो पण वातावरण बिघडू दिले नाही. पोलिसांनी कारवाई केली पण आम्ही शांतता राखली, आज हिजाब डे पण आहे. असं विधान यावेळी करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लीम महिला वर्ग हिजाब परिधान करु याठिकाणी जमला होता.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
नांदेडमध्ये एमआयएम पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिजाबच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शनकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'प्रत्येकाला कुठले कपडे परिधान करायचे याचे स्वातंत्र्य आहे, त्यामुळे हिजाबला विरोध कशासाठी? असा सवाल करत हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान हिजाब आमचे कवच कुंडल असून ते आमचे बुलेट प्रूफ जॅकेट असल्याचं मत काही मुस्लिम महिलांनी यावेळी दिलं. तसेच हिजाबवरून देशात असंतोष पसरवनाऱ्यांवर आणि हिजाबला विरोध करणाऱ्या विरोधात कडक कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
परभणीच्या गंगाखेडमध्ये मुस्लिम समुदायाचा मोर्चा
हिजाबच्या समर्थनार्थ आज परभणीत मुस्लिम समुदायातील हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानात या महिलांनी निदर्शन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कर्नाटकमध्ये हिजाब वरून राजकारण करत विनाकारण दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात जिल्हाधिकारी यांना निवदेनाद्वारे करण्यात आली. मुस्लिम समुदायातील महिला या हजारो वर्षांपासून हिजाब वापरत आहेत. परंतु आताच या हिजाबवरून का मुस्लिम मुली आणि महिलांना लक्ष केलं जातंय? असा सवाल ही या महिलांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून विचारला. तर दुसरीकडे गंगाखेड मध्येही मुस्लिम समुदायाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढत हिजाबचे समर्थन केले आहे.
सोलापूरातही हिजाबला समर्थन
सोलापुरातील शाही आलमगीर इदगाह या ठिकाणी शहर काझी मुफ्ती अमजदअली यांनी भाषण केले. आपल्या बयानमध्ये मुफ्ती अमजदअली यांनी हिजाबच्या मुद्यावरुन कर्नाटक सरकारचा निषेध केला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिजाबचा वाद निर्माण करुन दोन धर्मांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणीही या भुलथापांना बळी पडू नये. देशाची शांतता प्रस्थापित ठेवून संवैधानिक मार्गाने विरोध करावा असे आवाहन शहर काझी अमजद अली यांनी केले. आपल्या भाषणामध्ये मुफ्ती अमजदअली, 'हिजाबचा मुद्दा हा केवळ धार्मिक नाही तर संवैधानिक हक्कांच्या बाबतीत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे जाणीवपूर्वक सुरु आहे. असा आरोप केला. याशिवाय सतर्कतेचा उपाय म्हणून बुलडाणा आणि बीड शहरात जमावबंदी लागू करण्यात आली होती.
हे देखील वाचा-
- Kangana Ranaut On Hijab Row: ‘हिंमत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानात...’, कर्नाटक हिजाब प्रकरणावर संतापली कंगना!
- Hijab Controversy: कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद; मालेगावमध्ये साजरा होणार 'हिजाब दिवस'
- Hijab Controversy: हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद! पुण्यात राष्ट्रवादीचं भाजपविरोधात आंदोलन तर हिंदू महासभेची रॅली, गृहमंत्री म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha