राज्यातील 93 टक्के भागात मान्सूनची हजेरी, मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता
अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. मान्सून कोकणात दाखल झाल्यापासून समाधानकारक पाऊस तळकोकणात पडलेला नाही.
मुंबई : मान्सूनने राज्यातील 93 टक्के भाग व्यापल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. काल विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर आज राज्यातील अनेक भागात मान्सून दाखल झाला. तर मुंबईत येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
तळकोकणात ठराविक भागातच पाऊस पडत आहे. मालवण, कणकवली, वैभववाडी भागात पावसाने हजेरी लावली. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग या भागातील शेतकरी पावसाची अद्यापही आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. मान्सून कोकणात दाखल झाल्यापासून समाधानकारक पाऊस तळकोकणात पडलेला नाही.
पुणे, नाशिकमध्ये पावसाची हजेरी पुण्यात आज मान्सूनचं आगमन झालं. दुपारनंतर शहरातील बहुतांश भागात पावासाला सुरुवात झाली. येत्या चार दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यात बरसेल, असा अंदाज पुणे हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. नाशिक शहरातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली. तर उकाड्यामुळे हैराण झालेल्या नाशिककरांनाही दिलासा मिळाला.
बुलडाणा महिनाभरापासून प्रतीक्षेत असलेला पावसाने बुलडाणा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. महत्वाचं म्हणजे यावेळी हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. चांगली गोष्ट म्हणजे बुलडाण्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस पडला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येईल.
परभणी परभणीच्या सेलू तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. सेलू, देऊळगाव, कुपटा, वालूर, चिखलठाणा या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे उकाड्यापासून सुटका झाली असून बळीराजाही आनंदात आहे. छोट्या नदी नाल्यांना या पावसामुळे पाणी आलं आहे.
जालना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरडी असलेली पारधमधील रायघोळ नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. आज पहाटे पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदीचं पाणी शेतात देखील शिरलं.
लातूर लातूर शहर आणि परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी लातूर महापालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. पहिल्याच मोठ्या पावसात शहरातील नाल्यांना ओढ्याचं स्वरुप आलं होतं. अनेक भागातील घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ झाली. नाल्यातील कचरा काढण्यासंदर्भात महापालिकेला अनेकदा सूचना करण्यात आल्या. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे आज पहिल्याच पावसात शहरातील नाल्यांचं पाणी रस्त्यावर आलं.