Weather Update: चक्रीवादळाने पुन्हा पाऊस वाढणार; आजपासून राज्यात मुसळधार, कोकणसह मध्य महाराष्ट्राला 'यलो अलर्ट'
Maharashtra Weather Update: राज्यात 1 ते 4 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरातमध्ये आलेल्या चक्रीवादळासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुन्हा मान्सून सक्रीय होत आहे.
पुणे: राज्यात पावसाचा जोर (Heavy Rain) पुन्हा एकदा वाढला आहे, पुढील तीन ते चार दिवस हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. गुजरात किनारपट्टीवर घोंघावत असलेल्या असना चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा पाऊस वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबरची सुरुवातच जोरदार पावसाने होणार असून, राज्यभरात सर्वत्र 4 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज (Heavy Rain) वर्तवण्यात आली आहे. आज (रविवारी 1 सप्टेंबर) रोजी विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
राज्यात 1 ते 4 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरातमध्ये आलेल्या चक्रीवादळासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुन्हा मान्सून सक्रीय होत आहे. त्यामुळे विदर्भातील काही भागांत आज (रविवारी) अतिवृष्टी, तर उर्वरित राज्यात मुसळधार ते मध्यम पाऊस होईल. मुंबई-पुणे शहरांत 1 ते 4 सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटांसह पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त विभागप्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
सप्टेंबरमध्ये सरासरीहून अधिक पावसाची शक्यता
सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता (Heavy Rain) वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात देशात 109 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भ, कोकणासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आज कोणत्या भागात पावसाची शक्यता?
कोकणात आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
काही भागात जोरदार पावसाला सुरूवात
परभणीत पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे काल दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. यामुळे अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झाली. तर, अनेकांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला भात पीक जमीनदोस्त झालं. या पावसाचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना याचं प्रचंड नुकसान झालं आहे.
तर परभणीत पहाटेपासून सर्वत्र मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसतोय. परभणी शहरासह जिल्हाभरात पाऊस सुरू आहे. अनेक दिवसानंतर सर्व दूर पाऊस बरसत असल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तसेच छोटे मोठ्या ओढ्यांना ही पाणी वाहू लागलं आहे. एकूणच पिकांनाही हा पाऊस दिलासादायक आहे