(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सावधान! राज्यातील 'या' भागात पावसाचा यलो अलर्ट, आज कसं असेल वातावरण? हवामान विभागानं वर्तवला अंदाज
आज राज्यातील हवामान नेमकं कसं राहिल याबाबतची माहिती हवामान विभागानं (Imd) दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसानं (Rain) हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. दरम्यान, आज राज्यातील हवामान नेमकं कसं राहिल याबाबतची माहिती हवामान विभागानं (Imd) दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
'या' भागात जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोल्यात हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात हवामान खात्याने ग्रीन अलर्ट दिला आहे. 18 जूननंतर मुंबईत पावसाला सुरुवात होईल असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
राज्यात 22 जून पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार
राज्यातील काही भागात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. हा पावसाचा जोर किती दिवस राहणार? याबाबत प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 22 जून पर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडतच राहणार आहे. आज एका तालुक्यात तर उद्या दुसऱ्या तालुक्यात अशा तऱ्हेने पाऊस पडत राहणार असल्याचे पंजाबराव डख म्हणाले. 15 जूनपासून ते 17 जून पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची उघडीप राहणार आहे. परंतू, या कालावधीतही विदर्भात पाऊस सुरूच राहणार आहे. 15 जून पर्यंतच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी
पंजाबराव डखांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन ते चार दिवस राज्यातील सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, अकोला, हिंगोली, वाशिम, नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान मागील तीन ते चार दिवसात झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. कारण खरीपाच्या पेरणीसाठी चांगला पाऊस झाला असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.