एक्स्प्लोर
राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे. नंदुरबार, यवतमाळ, धुळे, अकोला या जिल्ह्यातील काही भागांत पावासाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
मुंबई : केरळात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. नंदुरबार, यवतमाळ, धुळे, अकोला या जिल्ह्यातील काही भागांत पावासाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तर गोंदियातही अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, तर देवरी तालुक्यातील डोंगरगावाला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.
नवापूरमध्ये पावसाचा कहर, पाच जण ठार
महाराष्ट्राच्याही अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पावसामुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. तर सहाजण बेपत्ता आहेत. सध्या परिसरातील तब्बल 300 च्यावर घरांची पडझड झाली आहे. तसेच 60 जनावरे देखील दगावली आहेत. नवापूर तालुक्यात शुक्रवारी पहाटे 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे विसरवाडी परिसरातील वाडी शेवाडी प्रकल्पाला भगदाड पडल्याने सरपणी नदीला पूर आला आहे.
अकोल्या विक्रमी पाऊस
गेल्या 48 तासांत अकोला जिल्ह्यात या मोसमातला सर्वाधिक पाऊस झाला आहे. मागच्या 48 तासात जिल्ह्यात सात तालुक्यांत सरासरी 90 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्याला अतिवृष्टीनं झोडपलं आहे. अकोला जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील पूर्णा, मोर्णा या नद्यांना पूर आला आहे.
बाळापूर तालूक्यातील निंबा, अंदूरा या गावांमध्ये तर मुर्तिजापूर तालूक्यातील काटेपूर्णा नदीकाठावरील शेलू बोंडे, भटोरी, दाताळा, मंगरूळ कांबे या गावांमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे धरणसाठ्यात मात्र काही प्रमाणात वाढ झाली आहे.
यवतमाळमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान
दिग्रस तालुक्यातील धानोरा येथील बाजीराव डेरे आणि उमरखेड तालुक्यातील सुकळी येथील अंकूश साबळे हे दोन तरुण पुरात वाहून गेले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने 937 घरांची पडझड झाली आहे. त्यामध्ये दिग्रस तालुक्यातील 400, महागाव तालुक्यातील 251, उमरखेड तालुक्यातील 100 घरांचा समावेश आहे. आत्तापर्यंत पुराच्या पाण्यात 29 जनावरं देखील वाहून गेली आहेत. दिग्रस शहरात काल एकूण 210 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अडाण प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. हवामान विभागाच्यावतीने अनेक गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
चंद्रपुरातही पावसाची जोरदार हजेरी
चंद्रपूरमध्ये कोरपना तालुक्यातील अंतरगाव या गावाला पुराच्या पाण्याने विळखा दिला आहे. सध्या अंतरगावकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने लोकांचा देखील संपर्क खंडित झाला आहे. प्रशासनाकडून परिसरातील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचे पाणी गावात आणि शेतात घुसल्याने मोठं नुकसान झालं आहे.
धुळ्यात ओढ्यांना, नाल्यांना पूर
धुळे जिल्ह्यात शुक्रवारच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे लोंढा नदीला आलेल्या पुरात दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. तर एक बैल गाडी वाहून गेली आहे. सध्या शिरपूर, साक्री तालुक्यातील लहान नदी, ओढ्यांना देखील पूर आला आहे. तर, दुसरीकडे धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावातील जलपातळी वाढली नसल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement