पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकून नवनीत राणा यांना अश्रू अनावर, मुख्यमंत्र्यांवरही साधला निशाणा
अमरावतीत पुरामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र डागलं आहे.

अमरावती : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून शेतीसह अनेक घराचं देखील नुकसान झालं आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अमरावती जिल्ह्यात उद्भवलेल्या या परिस्थितीनंतर लोकसभेच कामकाज आटोपून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या. पाऊस सुरु असताना त्यांनी खार तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची चिखलात जाऊन पाहणी केली. यावेळी मुसळधार पावसामुळं उद्भवलेली पूरस्थिती आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसाना पाहून नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले.
अमरावतीतील पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकताना नवनीत राणा यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पूरस्थितीमुळे जागोजागी चिखल, पाणी होतं. यातून वाट काढत त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. अमरावती जिल्ह्यातील अनेकांच्या घराची पावसाने पडझड झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती बघताना खासदार नवनीत राणाचे अश्रू अनावर झाले. अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक पूल खचले, गावगावांचा संपर्क तुटला, क्षतीग्रस्त पुलांची पाहणी करुन खासदार नवनीत राणा यांनी नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्याही पाहाव्यात : नवनीत राणा
अमरावतीतील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलं. पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्याही पाहाव्यात, असं म्हणत खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलं. तसेच स्वतः गाडी ड्रायव्हिंग करत विदर्भात येऊन या नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. जोपर्यंत अमरावतीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार कसं? मदत कशी दिली जाणार? असा थेट प्रश्नही खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
