(Source: Matrize)
मिरगाव दरड दुर्घटना : दुसऱ्या दिवशी बचावकार्यावेळी जमिनीखालून आवाज आला, 65 वर्षांच्या आजी बचावल्या!
गुरुवारी मध्यरात्री मिरगाववर दरड कोसळल्यानंतर अनेक गावकऱ्यांसह 65 वर्षांच्या सरसाबाई वाकाडेही जमिनीखाली गाडल्या गेल्या. दिवसभर सरसाबाईंचा शोध न लागल्याने त्यांची आशा कुटुंबीयांनी सोडून दिली होती.
Satara Landslide : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मिरगाव येथे घडलेल्या दुर्घटनेत सहा जणांचे मृतदेह काल एनडीआरएफ आणि ग्रामस्थांनी बाहेर काढले. अद्यापही सहा लोक अडकल्याची शक्यता आहे. कालच्या दिवसभरात पावसाने उघडीप दिली होती. मात्र रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला. आज सकाळी पावसाने विश्रांती दिलेले आहे. त्यामुळे आज एनडीआरएफची टीम काम करत असताना त्यांना थोडासा दिलासा मिळू शकणार आहे.
आजीबाई बचावल्या
गुरुवारी मध्यरात्री मिरगाववर दरड कोसळल्यानंतर अनेक गावकऱ्यांसह 65 वर्षांच्या सरसाबाई वाकाडेही जमिनीखाली गाडल्या गेल्या. जे वाचले त्यांची अंधारात पळापळ झाल्याने कोण कुठं अडकलंय हे कुणालाही समजलं नाही. संपूर्ण दिवसभर सरसाबाईंचा शोध न लागल्याने त्यांचीही आशा कुटुंबियांनी सोडून दिली होती. मात्र एक दिवसानंतर बचावकार्य सुरु झालं आणि जमिनीखालून आवाज येत असल्यानं तिथं पाहीलं असता फक्त डोकं वर असलेल्या अवस्थेत सरसाबाई जिवंत आढळल्या. या प्रसंगाचा धक्का बसल्याने सरसाबाई आज बोलण्याच्या अवस्थेत नाहीत पण त्यांना पाहून सरसाबाईंची मुलगी आणि मुलाला या परिस्थितीतही आनंदाश्रू अनावर झाले.
Maharashtra Rains LIVE : मुख्यमंत्री चिपळूणमध्ये, बाजारपेठेची पाहणी, व्यावसायिकांशी चर्चा, आढावा बैठक
मिरगाव मधली असंख्य कुटुंब ही नोकरी निमित्ताने मुंबईला स्थलांतरित झालेली आहेत. या घटनेची माहिती समजली त्यावेळेला सर्व नातेवाईकांनी मिरगावकडे धाव घेतली. मात्र रस्ते बंद असल्यामुळे या सर्व लोकांना घटनास्थळी जाता आले नाही. ज्या लोकांना यातून वाचवलेलआहे अशा सर्वांची प्रशासकीय यंत्रणेने सोय कोयनेतील मराठी शाळेमध्ये केली आहे. ज्यांचे नातेवाईक या दरडीखाली गाडले गेलेले आहेत. त्यांना अश्रू अनावर होताना पाहायला मिळत आहे.
मिरगाव येथे घटना घडून आजचा चौथा दिवस आहे. मात्र या गावांमध्ये एनडीआरएफची टीम कालपर्यंत पोहोचू शकली. कोयना धरणापासून ते मिरगावपर्यंत जाणाऱ्या रोडवर मोठे दरड कोसळल्यामुळे या परिसरातील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. शिवाय कोयना धरणातील पाण्यालाही मोठ्या लाटा तयार झाल्या होत्या. त्यामुळे बोटीदेखील आतमध्ये जावू शकत नव्हत्या.