Health Recruitment: आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरणार: आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत
राज्यात आतापर्यंत 8,330 उपकेंद्र, 1,862 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 582 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र असे 10,774 आरोग्य केंद्र हे आरोग्यवर्धिनी केंद्रात कार्यान्वित झाले आहेत.
मुंबई : आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत, ती लवकरच भरण्यात येतील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी दिली आहे. आयुष्यमान भारत योजनेतून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय व आरोग्य अधिकारी यांची पदे रिक्त होती.
आरोग्य अधिकाऱ्यांच्या (Health Department Recruitment) या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने डिसेंबर 2022 पर्यंत 10,356 आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्याचे लक्ष राज्याला दिले होते. राज्याने आतापर्यंत 8,330 उपकेंद्र, 1,862 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 582 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र असे 10,774 आरोग्य केंद्र हे आरोग्यवर्धिनी केंद्रात कार्यान्वित केले आहेत. राज्यातील उपकेंद्राद्वारे 5,000 लोकसंख्येला आरोग्यवर्धिनी केंद्र निर्माण करण्यात आले आहेत या केंद्रामध्ये तेरा प्रकारच्या सेवा रुग्णांना दिल्या जात आहेत.
आरोग्यवर्धिनी केंद्राच्या अंतर्गत प्रामुख्याने प्रसुती पूर्व, प्रसूती सेवा नवजात बालकांना सेवा, बाल आणि किशोरवयीन आजार व लसीकरण, कुटुंब नियोजन गर्भनिरोधक आवश्यक सेवा, सामान्य रोगाची बाह्य रुग्ण सेवा, संसर्गजन्य रोग नियोजन, असंसर्गजन्य रोग व तपासणी ,मानसिक आरोग्य नियोजन ,कान, नाक, घसा डोळे व सामान्य आजार संबंधीच्या सेवा, दंत मुखरोग आरोग्य, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा, आयुष व योग अशा सेवांचा यात समावेश आहे.
आरोग्य विभागात साडेचार हजार भरती जाहीर
राज्य सरकारकडून अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने 75 हजार नोकर भरती करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये आरोग्य विभागात साडेचार हजार जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पोलिस विभागात 18 हजार जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. सध्या त्या संबंधित अर्ज भरती प्रक्रिया सुरू आहे. ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेमध्ये जवळपास दहा हजार जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. लवकरच राज्यात शिक्षक भरती करण्याचा निर्णय राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. तसेच कौशल्य विकास विभागामार्फत खाजगी कंपन्यांमध्ये एक लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी करार करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात रोजगार मेळावे घेऊन हा रोजगार देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे.
ही बातमी वाचा :