मशिदीवरील भोंग्यांविरोधात मनसेची 'हनुमान चालिसा'; पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड
Hanuman Chalisa Loudspeaker Row : राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून अजान सुरु असताना हनुमान चालिसा पठण, पहाटेच्यावेळी मशिदींसमोर आंदोलन, अनेक ठिकाणी मनसैनिकांची धरपकड
Hanuman Chalisa Loudspeaker Row : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. मुंबईतील अनेक भागांत मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.
ठाण्यातील मनसैनिकांनी आज पहाटे झालेल्या अजानचा विरोध करत लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली. पहाटे 5.14 मिनटांनी ठाणे इंदिरा नगरमधील एका मशिदीवर अजान झाली. त्याचा विरोध म्हणून मनसे कार्यकर्ते पप्पू कदम यांनी या मशिदीच्या जवळच असलेल्या इंदिरा डोंगरावरच्या महालक्ष्मी मंदिरात भोंगा लावून हनुमान चालिसा पठण सुरू केलं. तर कल्याण डोंबिवलीमध्ये 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. काल रात्रीच्या सुमारास मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काल रात्रीपासूनच मशिद-मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेच्या सुमारास अजान भोंग्याविना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. तसेच, नवी मुंबई- ऐरोलीजवळच्या जामा मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करण्यात आला होता. हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
'एबीपी माझा'चा रिअॅलिटी चेक
मुंबईच्या मशिदींमध्ये ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन होते का? याचा रियालिटी चेक करण्यासाठी मुंबईच्या मदनपुरा येथील प्रसिद्ध बडी मशीदसमोर एबीपी माझा पहाटे पोहचलं. या ठिकाणी ठीक 5 वाजताच्या दरम्यान अजान लाऊडस्पीकरवर सुरू झाली. तसेच त्याचा आवाज नियमापेक्षा जास्त असल्याचंही समोर आलं.
औरंगाबादमध्येही कडेकोट बंदोबस्त
औरंगाबादमध्ये 48 मशिदींबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. संवेदनशिल ठिकाणी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये 1 मे रोजी झालेल्या सभेतच मशिदीवरील भोंग्यांबाबत इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी शहरात संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवला आहे.
मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका कायम ठेवलीय. राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीपासून पोलीस अलर्ट मोडवर आहेत. मुंबईतील रस्त्यावर ठिकठिकाणी नाकाबंदी करुन प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.