नाव काय त्यांचं? कोण होते ते? जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहताना अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा सवाल
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सीडीएस जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहताना त्यांचं नाव काय आहे आणि ते कोण होते असा सवाल त्यांच्या कार्यकर्त्याला केला.
मुंबई : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा तामिळनाडूमध्ये अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवाला आज अग्नी देण्यात आली. देशाची शान असलेल्या भारतीय लष्कराचे ते पहिले सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. पण अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना मात्र त्यांचं नाव माहिती नाही, ते कोण आहेत हे देखील माहिती नाही. हे आम्ही सांगत नाही तर त्या संबंधीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
त्याचं झालं असं की, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सीडीएस जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यावर बोलण्यासाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी माईक घेतला पण आपण कोणाबद्दल बोलतोय हेच ते विसरले. मग त्यांनी 'त्यांचं नाव काय आहे रे?' असा प्रश्न त्यांनी मागे उभ्या असलेल्या कार्यकर्त्याला विचारला.
कोण आहेत ते? सदावर्तेंचा प्रश्न
मागच्या कार्यकर्त्यांने जनरल बिपीन रावत यांचे नाव घेतल्यानंतर सदावर्तेंनी पुन्हा त्यांना विचारलं की 'कोण आहे ते?' मग मागच्या कार्यकर्त्यांने त्यांना पुन्हा सांगितलं की जनरल बिपीन रावत हे तिन्ही सेना दलाचे प्रमुख आहेत. त्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी आपले भाषण सुरु केलं.
एखादा व्यक्ती सभेमध्ये बोलताना नाव विसरतो, किंवा संबंधित व्यक्तीची माहिती विसरतो. हे अनेकदा घडतं. पण अॅड. गुणरत्न सदावर्तेंसारख्या मोठ-मोठी भाषणं हाणणाऱ्या व्यक्तीने देशाच्या लष्कराच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याचे नाव विसरणं हे काही पटत नाही. महत्वाचं म्हणजे जनरल बिपीन रावत यांच्याच श्रद्धांजली सभेत त्यांचंच नाव आणि ते कोण होते ते अॅड. सदावर्तें विसरले. त्यामुळे अशा सभा केवळ पब्लिसिटीसाठी आयोजित केल्या जातात का असाही प्रश्न उपस्थित होतोय.
संबंधित बातम्या :