(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधी अर्ज भरताना, आता निवडणूक खर्चाचा तपशील ऑनलाईन भरताना खोळंबा, ग्रामपंचायत उमेदवारांचे टेन्शन वाढले
Gram Panchayat Election : आधी अर्ज भरताना आणि आता निवडणूक खर्चाचा तपशील भरताना वेबसाईट डाऊन झाल्याने ग्रामपंचायत उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.
बीड : ग्रामपंचायत निवडणूक ( Gram Panchayat Election ) लढणाऱ्या प्रत्येकाला निवडणुकीसाठी झालेला खर्च शासनाकडे सादर करण्यासाठी एक महिन्याचा अवधी मिळतो. 18 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. मतदान झाल्यानंतर आता मुदतीच्या एक महिन्यांपैकी बारा दिवस उलटून गेले आहेत. मात्र उमेदवारांना ज्या वेबसाईटवर निवडणुकीचा ऑनलाईन खर्च भरावायचा आहे ती वेबसाईट चालत नसल्याने राज्यातील हजारो उमेदवारांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय.
बीड जिल्ह्यातील करसुंडी गावातील हनुमान मुळे यांनी मागच्या वेळी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि निवडणुकीत झालेल्या खर्चाचा तपशील तहसीलला कळवला. मात्र हा खर्च तहसीलच्या रेकॉर्डला आलाच नाही. एक महिना उलटून गेल्यानंतर हनुमान मुळे यांना पाच वर्ष निवडणूक लढण्यास बंदीची कारवाई करण्यात आली. एकट्या बीड जिल्ह्यात मागच्या वर्षी 1000 पेक्षा जास्त उमेदवारांवर ही कारवाई करण्यात आली. परंतु, आता अशीच भीती राज्यभरातील निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांमध्ये निर्माण झाली आहे. कारण मतदान झाल्यापासून एक महिन्याच्या आत निवडणूक लढलेल्या प्रत्येक उमेदवाराने त्याचा निवडणुकीच्या खर्चाचा तपशील ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे सादर केला नाही तर त्यांच्यावर या पुढची निवडणूक लढण्यास बंदीची कारवाई होऊ शकते. हा तपशील ऑनलाई पद्धतीने भरायचा आहे. परंतु, हा तपशील भरत असताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे निवडणुकीत झालेल्या खर्चाचा तपशील केवळ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारालाच नाही तर निवडणूक लढलेल्या प्रत्येक उमेदवाराला देणे बंधनकारक आहे. एकट्या बीड जिल्ह्यामध्ये अशा उमेदवारांची संख्या 20 हजारांपेक्षाही जास्त आहे.
20 जानेवारीपर्यंत या सर्व उमेदवारांना आपला खर्च ऑनलाइन सादर करावा लागणार आहे. यासाठी वेबसाईट आणि टू वोटर या ॲपच्या माध्यमातून उमेदवार हा खर्च भरू शकतात. मात्र हे ॲप देखील चालत नाही. शिवाय खर्च भरण्यासाठी शासनाची जी साईट आहे ती देखील चालत नाही. त्यामुळे तपशील भरण्यासाठी उमेदवार नेट कॅफेवर गर्दी करत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीचा फॉर्म भरताना सुरुवातीलाच उमेदवारांना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी रात्र रात्र कॅफेवर जागून काढावे लागले होते. त्यानंतर सरकारने ऑफलाइन अर्ज घ्यायला सुरुवात केली. परंतु, आता पुन्हा
खर्चाच्या तपशीलासाठी देखील ऑफलाइन अर्ज स्वीकारल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी भावना उमेदवार व्यक्त करत आहेत.
महत्वाच्या बातम्या