Pune Grapanchayat News : बारामतीत मायलेकं झाले ग्रामपंचायत सदस्य; पंचक्रोशीत दोघांचीच चर्चा
Gram Panchayat Election Result: बारामती तालुक्यातील पणदरे येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आई आणि मुलाने ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याची किमया केली आहे.
Pune Grapanchayat News : बारामतीत 13 ग्रामपंचायत (Pune Gram Panchayat Election Result 2022)निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामधील एका निकालाची चर्चा राज्यभर रंगली आहे. यामध्ये बारामती तालुक्यातील पणदरे येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आई आणि मुलाने निवडणूक जिंकण्याची किमया केली. विक्रम कोकरे आणि संगीता कोकरे अशी त्यांची नावे आहेत.
बारामती तालुक्यात प्रथमच आई आणि मुलगा हे एकाच ग्रामपंचायतचे सदस्य झाल्याची घटना आहे. यंदा नात्यागोत्यांची ग्रामपंचायतीत निवडणूक बघायला मिळली. त्यात अनेकांन यश मिळालं तर अनेक अपयशी झाले. मात्र आई आणि मुलगा दोघेही निवडून आल्याने या दोघांची सध्या पंचक्रोशीत चांगलीच चर्चा सुरु आहे.
विक्रम कोकरे आणि संगीता कोकरे हे दोघेही बारामती तालुक्यातील पणदरे गावात राहतात. मागील अनेक वर्षांपासून विक्रम सामाजिक कार्य करतात. विक्रम यांचं बारावीपर्यंतच शिक्षण झालं आहे. त्यानंतर त्यांनी आयटीआयचं शिक्षण घेतलं आहे. सध्या गावात ते वॉटर प्लॅंटचा व्यावसाय करतात. मात्र त्यांना सुरुवातीपासून सामाजिक कार्यात रस होता. त्यामुळे त्यांनी 2016 मध्ये सामाजिक कार्यात उतरण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये त्यांनी गावातील विविध प्रश्नांसाठी आवाज उठवला. त्यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनंदेखील केली. त्यानंतर त्यांनी यावर्षी निवडणुकीत त्यांनी आणि त्यांच्या आईने सदस्यपदाचा अर्ज भरला होता आणि या निवडणुकीत ते दोघेही विजयी झाले आहे.
विक्रम कोकरे यांच्या आई संगीता कोकरे या गृहीणी आहेत. त्या शेतीकामात मदत करतात. घरातील सगळं सांभाळून त्यांनी निवडणुकीसाठी अर्ज केला होता. त्याचा प्रचारही जोरात केला. मायलेकाने एकत्र येत या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. त्यांच्या मेहनतीला यश आलं आहे. लोकशाही काय असते आणि त्याचा विजय कसा होतो, हे पणदरे गावातील नागरिकांनी दाखवून दिलं आहे. नागरिकांची सेवा करण्यासाठी आम्ही मायलेकं कटीबद्ध आहोत. गावाचा विकास करण्यात आम्ही सगळी मेहतन करु, असा विश्वास त्यांनी गावकऱ्यांना दिला आहे.
70 वर्षांपासून प्रस्तापितांवर विजय
या गावात मागील 70 वर्षांपासून एका कुटुंबाने गावाची सत्ता भोगली, त्यांच्या घराला नाकारुन त्यांना खिंडार पाडून दोनशेहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे. जनतेच्या या पाठिंब्याने जनतेने लोकशाहीचं मालक असल्याचं दाखवून दिलं आहे. आम्हाला दिलेलं सत्तेचं समीकरण आम्ही कधीही विसरणार नाही, गावकऱ्यांचे आम्ही दोघेही कायम ऋणी राहू, असं विक्रम कोकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.