Nagpur: गोरेवाडा पर्यटन पाहायचंय तर खिशाला फटका, दर वाढणार; विद्यार्थ्यांना मात्र सवलत
विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के सवलत व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 25 % सवलत आहे. ती शासकीय सुट्टी वगळून केवळ मंगळवार ते शुक्रवार या दिवसासाठी लागू राहणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
Nagpur News : महागाईने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असताना आता बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी उद्यानातील (Balasaheb Thackeray Gorewada International Zoological Park) प्रवेश शुल्कात दिलेली सवलत रद्द करण्यात आली. त्यामुळे गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पर्यटनासाठी पर्यटकांना जादाचे पैसे मोजावे लागणार आहे. उद्घाटनाच्या वेळेस राज्य सरकारने एक वर्षासाठी 25 टक्के तिकिटावर सवलत देण्याचे जाहीर केले होते. मात्र, कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे अद्यापही ही सवलत सुरू होती. ती सवलत आता 15 नोव्हेंबरपासून रद्द करण्यात येणार असल्याने आता अधिकचे शुल्क मोजूनच गोरेवाड्यातील पर्यटनाचा आनंद घ्यावा लागणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 26 जानेवारी 2021 रोजी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी उद्यानातील इंडियन सफारीचे उद्घाटन झाले. त्यावेळी सफारीसाठी निर्धारित केलेल्या दरात 25 टक्के सवलत एक वर्षासाठी जाहीर केली होती. त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव होता. कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यानंतर पर्यटकांना आकर्षित करण्याच्यादृष्टीने इंडियन सफारीसाठी सवलतीचे दर लागू केले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असून निर्बंधही संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे मुळ दरात आता पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घ्यावा लागणार आहे. सवलत रद्द केल्याने सरासरी 60 ते 80 रुपयांची वाढ बसच्या शुल्कात झालेली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर सवलत बंद होईल अशी चर्चा होती, मात्र आता या निर्णयानंतर चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
सफारीचे शुल्क (एसी बस)
वार | आताचे दर | नवीन दर |
सोमवार ते शुक्रवार | 240 रुपये | 300 रुपये |
शनिवार, रविवार, सार्वजनिक सुटी | 320 रुपये | 400 रुपये |
नॉन एसी बस | ||
सोमवार ते शुक्रवार | 160 रुपये | 200 रुपये |
शनिवार, रविवार, सार्वजनिक सुटी | 240 रुपये | 300 रुपये |
विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत
विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के सवलत व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी (student discount) 25 टक्के सवलत आहे. ती केवळ मंगळवार ते शुक्रवार (शासकीय सुट्टी वगळून) या दिवसासाठी लागू राहणार आहे. तशीच सवलत शिकवणी वर्ग चालविणाऱ्या संस्था, आश्रम शाळा, अनाथाश्रम, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण संस्थाकरिता लागू आहे. वरील सवलतीसाठी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालय संचालक यांच्या नावे विनंती पत्र 15 दिवसांपूर्वी विद्यालय, महाविद्यालयाच्या लेटर हेडवर देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महत्त्वाची बातमी