गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची 'रॉ'मार्फत चौकशी व्हावी : धनंजय मुंडे
गोपीनाथ मुंडे यांचं राजधानी दिल्लीत कार अपघातामध्ये निधन झालं होतं. 3 जून 2014 रोजी दिल्ली विमानतळावर जाताना त्यांच्या गाडीला एका वेगवान कारने धडक दिली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुंडेंना तातडीने 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलं, मात्र कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली होती.
मुंबई : दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची आणि भारतातील निवडणुकांची रॉ मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला तेव्हाच तो अपघात नसून घातपात असावा अशी शंका मुंडेंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होती.
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत सय्यद शुजा या आंतरराष्ट्रीय सायबर तज्ज्ञाने केलेल्या गंभीर आरोपांमुळं त्या शंकेला पुष्टी मिळाली असून हे धक्कादायक असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. हे प्रकरण एका मोठ्या नेत्याचा मृत्यू आणि सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणुकांशी संबंधित असल्याने याची 'रॉ'मार्फत किंवा सर्वाच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सय्यद शुजा या हॅकरने अत्यंत खळबळजनक आरोप केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) हॅक करण्याचं तंत्र आपल्याकडून आत्मसात केल्याचंही हॅकरने म्हटलं आहे. त्यामुळेच निवडणुकांमध्ये भाजपला बंपर विजय मिळाल्याचं हॅकरने सांगितलं.
2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या वेळी गोपीनाथ मुंडेंनी आपल्याशी संपर्क साधला होता, असा दावा सय्यद शुजाने केला. गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅक केल्याची माहिती होती. मुंडे ही बाब जगजाहीर करण्याच्या भीतीनेच भाजपमधील काही नेत्यांनी त्यांची हत्या घडवून आणली, असा दावा सय्यद शुजाने यावेळी केला.
गोपीनाथ मुंडे यांचं राजधानी दिल्लीत कार अपघातामध्ये निधन झालं होतं. 3 जून 2014 रोजी दिल्ली विमानतळावर जाताना त्यांच्या गाडीला एका वेगवान कारने धडक दिली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुंडेंना तातडीने 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलं, मात्र कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली होती.
संबंधित बातम्या