ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले गुरुजींविरोधात अपप्रचाराची मोहीम
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्यांना ज्या पद्धतीची अपमानास्पद वागणूक दिली त्याच्या विरोधात जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये संतापाची भावना पाहायला मिळत आहे.
सोलापूर : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना परदेशात संशोधनासाठी जिल्हा परिषदेनं रजा मंजूर केली. माझाच्या बातमीची दखल घेऊन डिसले गुरुजींना परदेशात जाण्याची परवानगी तातडीनं देणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी डिसलेंच्या आरोपांचीही दखल घेतली आहे. त्रास देणाऱ्यांची आणि पैसे मागणाऱ्यांची माहिती द्या असं पत्र स्वामी यांनी डिसले गुरुजी यांना पाठवलं आहे.
डिसले यांना अमेरिकेतील फुलब्राइट संस्थेची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. या शिष्यवृत्तीसाठी त्यांना आता रजा देखील मंजूर करण्यात आलेली आहे. मात्र दीड महिने रजेचा अर्ज प्रलंबित होता. पाठपुरावा केल्यावर मानिसक त्रास दिला आणि पैशाची मागणी करण्यात आली, असा आरोप डिसले यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. याचीच दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली आहे. ज्यांनी कोणी त्रास दिला असेल किंवा पैशांची मागणी केली असेल त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. डिसले गुरुजींनी संबंधितांची नावे आणि पुरावे द्यावेत. अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
रणजीतसिंह डिसले यांना अमेरिकेत जाण्यास अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश केल्यानंतर यंत्रणेनं आता प्रतिशोध मोहीम हाती घेतल्याचं दिसतंय. राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं त्यांच्या कामाचं कौतुक करणारे अहवाल दिल्यानंतर आता डिसले गुरुजींनी नेमकं काय काम केलं? असा सवाल करुन त्यांना कटघऱ्यात उभं करण्यात आलंय.
शिक्षकांनी काळ्या फिती लावून केले आंदोलन
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्यांना ज्या पद्धतीची अपमानास्पद वागणूक दिली त्याच्या विरोधात जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये संतापाची भावना पाहायला मिळत आहे. शिक्षण विभागाकडून दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध करण्यासाठी पंढरपुरातल्या सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले.
संबंधित बातम्या
- डिसले गुरुजींसाठी रविवारीही शिक्षण विभाग सुरु राहणार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती
- ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंना सरकारी 'बाबूं'चा त्रास, नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत
- ग्लोबल टीचरची लोकल कुचंबणा! जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांची फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजा मंजूर करण्यात आडकाठी
- आता राज्यभर 'शाळा' घेणार ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले, सर्व जिल्ह्यांमध्ये देणार धडे